मुंबई : दलित समाजाला भारतीय जनता पार्टीच्या केंद्र आणि राज्य सरकारने आदराने व अभिमानाने जवळ करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ गतिमान केली आहे, परिणामी आज सर्व दलित समाज भाजपाचे काम करू लागला आहे. असे मत ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते काकासाहेब खंबाळकर यांनी शुक्रवारी मुंबईत व्यक्त केले.
भाजपा प्रदेश कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना १२६ व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी पोलीस अधिकारी वाय. सी. पवार व भाजपा कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.
खंबाळकर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या स्थानांवर त्यांचे स्मारक तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सरकारने बाबासाहेबांच्या विचारांनुसार काम सुरू ठेवले आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी दर दहा वर्षांनी चलन बदलण्याचा विचार बाबासाहेबांनी मांडला होता. मोदी सरकारने देशात नोटबंदीचा निर्णय घेतला.
वाय. सी. पवार म्हणाले की, काँग्रेस पक्षाने सत्तर वर्षे सत्तेवर असताना दलित समाजातील काही जणांना थोडासा लाभ दिला पण समाजाच्या व्यापक हितासाठी काही केले नाही. भाजपाने सत्ता मिळताच दलित समाजासाठी धोरणात्मक निर्णय घेतले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा हस्तांतरित करण्यासाठी काँग्रेसला इतकी वर्षे कायदेशीर तरतूद सापडत नव्हती पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रश्न सोडविला. भाजपा प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे कार्यालय सचिव सुरेश गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.