Mumbai, 10 July : पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस चे वाढते दर आणि वाढत्या महागाईविरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनाचा आज चौथा दिवस होता. आज मुंबईतील 31 वॉर्डस मध्ये मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. कलिना विधानसभा आणि प्रतीक्षानगर, सायन विधानसभा क्षेत्रांत करण्यात आलेल्या आंदोलनात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप सहभागी झाले होते.या आंदोलनादरम्यान भाई जगताप यांनी परखड टीका करत केंद्रातील मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला. भाई जगताप म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार हे मुके, बहिरे आहे हे मला माहित होतं, पण हे सरकार आंधळं सुद्धा आहे हे मला आज कळलं. गरिबांच्या समस्या त्यांचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या नेत्यांना कधीही ऐकू गेले नाहीत की त्याबद्दल ते कधीही बोलत नाहीत.
अंबानी-अदानी सारखे जगातील 1 व 2 नंबरचे श्रीमंत उद्योगपती पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र आहेत, त्यांच्याकडे मोदी लक्ष देतात. मग देशातील गरीब जनतेचे काय? त्यांच्याकडे कोण बघणार? आज भारतात पेट्रोल 107 रुपये प्रति लिटर ने मिळत आहे, तर घरगुती गॅस 950 रुपये प्रति सिलिंडर दराने मिळत आहे. ज्यावेळेस पेट्रोल व डिझेल चा दर 1 रुपयाने वाढतो, त्यावेळेस महागाई सुद्धा वाढते. देशातील जनतेसमोर आपलं घर कसे चालवायचे हा प्रश्न आज उभा आहे. केंद्रातील हे सरकार आंधळे सुद्धा झाले आहे का? महागाईमुळे पोळून निघणाऱ्या जनतेचे हाल यांना दिसत नाहीत का? हे आंदोलन म्हणचे या जनतेचा राग आहे, हा त्यांचा उद्रेक आहे आणि हा उद्रेक केंद्रातील भाजप सरकार पर्यंत पोहचविण्यासाठीच आम्ही आंदोलन करत आहोत. मागील 70 वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था कधीही खालावली नव्हती. आज बांग्लादेशचा जीडीपी भारतापेक्षा जास्त आहेत. एवढे सगळे होत असताना महाराष्ट्रातील भाजपचे नेते केंद्रातील मोदी सरकारला प्रश्न करत नाहीत. उलट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते राज्य सरकार पेट्रोल-डिझेल दरवाढीसाठी महाराष्ट्र सरकारला जबाबदार धरत आहेत. महाराष्ट्र सरकारने इंधनावरील आपला सेझ कमी करावा असे सांगत आहेत. केंद्राने पेट्रोल डिझेलवरील 11 रुपयांचा अबकारी कर (सेझ) 32 रुपयांवर आणून ठेवला आणि तरी देखील राज्य सरकारला जाब विचारायला यांना जरासुद्धा लाज कशी वाटत नाही? हे कसल्या प्रकारचे घाणेरडे राजकारण आहे? केंद्रामध्ये यापूर्वी आम्ही यापूर्वी अनेक सत्ताबदल पाहिले, अनेक सरकारं पहिली, पण एवढे निर्लज्ज, निगरगट्ट व गरीबविरोधी सरकार यापूर्वी आम्ही कधीच पाहिले नाही. या सरकारने कितीही मुकेपणाचे, बहिरेपणाचे व आंधळेपणाचे सोंग आणले. तरी आमचे आंदोलन अशाच प्रकारे कसलीही तमा न बाळगता सुरू ठेवणार आहोत, असे भाई जगताप म्हणाले.
या आंदोलनामध्ये मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या समवेत मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा, मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हुकूमराज मेहता, मुंबई काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष कचरू यादव, मुंबई काँग्रेस युवा मोर्चाचे गणेश यादव, दक्षिण मध्य मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदीप शुक्ला व सुभाष पिसाळ, मुंबई काँग्रेसचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.















