रत्नागिरी : 2019 नंतर आणखी एखादा मोदी देशाच्या बाहेर पळू शकतो असं म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली आहे. चिपळूण इथे संध्याकाळी काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचं आगमन झालं, त्यानंतर झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही मोदींवर निशाणा साधला.
विरोधकांनी सध्या सरकार विरोधात रान उठवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेनंतर मंगळवारी काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा जिल्ह्यात दाखल झाली. राजापूरनंतर चिपळूणमध्ये रात्री सभा झाली. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, खा.हुसेन दलवाई, सचिन सावंत, भाई जगताप, जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. खूप दिवसानंतर चिपळूणमध्ये काँग्रेसची झालेली ही सभा यशस्वी होण्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी विशेष मेहनत घेतली.
दरम्यान या सभेत भाई जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरपूस समाचार घेतला. तिकडे नरेंद्र मोदी, ललित मोदी कोण आणि हे पळणारे सगळे मोदीच का असतात, मला तर भिती आहे की 2019 नंतर आणखी एखादा मोदी देशाबाहेर पळू शकतो अशा शब्दांत मोदींवर निशाणा साधला.
तर सचिन सावंत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. काँग्रेसचं राज्य असताना सर्व भ्रष्टाचारी जेलमध्ये होते, मात्र मोदींचं राज्य आल्यावर विजय मल्ल्या भूर, निरव मोदी भूर म्हणजे कावळा उड, चिमणी उड तसे सर्वजण उडतच गेले, मग चौकीदार काय करतोय, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सावंत यांनी खिल्ली उडवली.