मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचे हित साधले जाईल, असे संविधान लिहिले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बाबासाहेबांचे विचार हे फार प्रागतिक होते. त्यांच्या विचारामुळे आणि संविधान निर्मितीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानामुळे आपला देश प्रचंड वेगाने प्रगती करत आहे, असेही ते म्हणाले.
येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज ‘भारत का संविधान’ या चित्रपटाचे प्रोमो लाँचिंग आणि पोस्टरचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, चित्रपटाचे निर्माते सचिन मून, दिग्दर्शक नरेंद्र शिंदे, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक भैय्याजी खैरकार, संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार, गुरुजी कुमारन स्वामी, भंते विनय बोधी आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या देशाचे संविधान, नागरिकांचे मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये आदी सर्व माहिती लोकांना होणे गरजेचे आहे. संविधान निर्मितीच्या वेळी संविधान सभेत झालेल्या विविध चर्चा या देशाच्या जडणघडणीचा मुलभूत ठेवा आहेत. या सर्व बाबींचे दर्शन घडविणारा ‘भारत का संविधान’ हा चित्रपट माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी असून तो सर्वांनीच आणि विशेषत: आजच्या तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी अवश्य पहावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
राज्यात चित्रपट करमुक्त
या चित्रपटाचे महत्त्व लक्षात घेता हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. ते म्हणाले की, संविधान हे सर्वांना समजावून सांगण्याची आवश्यकता आहे.
बौद्ध लेण्यांच्या संवर्धनासाठी सरकार पुढाकार घेईल
देशातील बौद्ध लेणी हा देशाचा फार मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. या देशाची हजारो वर्षांची संस्कृती या लेण्यांमधून व्यक्त होते. राज्यातही अनेक बौद्ध लेणी असून त्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासन पुढाकार घेईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.चित्रपट निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या विविध व्यक्तींचा तसेच संविधान अभ्यासक, चळवळीतील कार्यकर्ते आदींचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी हस्तांतरित करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल यावेळी विविध संस्था, संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.