मुंबई : बेस्टच्या कामगारांची आज आर्थिक पेचप्रसंगातून सुटका झाली. ४० हजार कामगारांचे वेतन झाले. उर्वरित दोन हजार अधिकाऱ्यांचे वेतन उद्या होईल. फेब्रूवारी महिन्याचे वेतन कामगारांना मिळाले नव्हते. दर महिन्याला दहा तारखेला मिळणारे वेतन यावेळी २१ तारखेला कामगारांना मिळाले. बेस्टमधील कामगारांनी वेतन न झाल्यास बेमुदत संपाचा इशाराही दिला होता. अखेर प्रशासनाला जाग येऊन वेतनाचा तिढा सोडवला गेला. १८० कोटी त्यासाठी वितरित केले जाणार आहेत. ऐन होळी सणाच्या दिवसात वेतन न मिळाल्याने कामगारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही वेतन मिळण्याबाबत मध्यस्थी केली होती. महापौर दालनात बैठकही झाली होती. सभागृहनेते यशवंत जाधव, बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील आणि पालिका आयुक्त अजोय मेहता हे बैठकीस उपस्थित होते.