
मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : बेस्ट कर्मचार्यांनी तीन दिवसांपासून सुरू केलेल्या साखळी उपोषणाची दखल पालिका प्रशासनाने घेतली नाही. तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या ‘बेस्ट’ला आर्थिक सहाय्य देण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या बेस्ट कर्मचार्यांच्या संघटनांनी सहा ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
‘बेस्ट’ उपक्रम हा पालिकेचाच उपक्रम आहे. तरीही पालिकेकडून कोणतेही आर्थिक सहाय्य बेस्टला मिळत नाही. सध्या ‘बेस्ट’ आर्थिक संकटात सापडली आहे. कर्मचार्यांचे वेतन विलंबाने होत आहेत. अनेक वेळा मागणी करूनही पालिका आयुक्त ‘बेस्ट’ला आर्थिक सहाय्य करण्यास टाळाटाळ करीत आहेत. या पार्श्वभूमीवर बेस्टच्या विविध कामगार संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त कृती समिती स्थापन केली. या समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तातडीने निर्णय घ्या. अन्यथा ६ ऑगस्ट मध्यरात्रीपासून बेमुदत संप सुरू, असा इशारा दिला आहे.
आज महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार सुनील शिंदे, अजय चौधरी, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
‘बेस्ट’च्या वडाळा डेपोसमोर १ ऑगस्टपासून संयुक्त कृती समितीने उपोषण सुरू केले आहे. मात्र पालिका प्रशासनाने त्यांच्याशी साधी चर्चादेखील केली नाही. म्हणूनच बेमुदत संपाचा निर्णय समितीने घेतला आहे.
संपामध्ये बेस्ट कामगार सेना, बेस्ट वर्कस युनियन, बेस्ट कामगार संघटना, बेस्ट कामगार युनियन, बेस्ट एम्प्लॉइज युनियन, बेस्ट परिवहन कर्मचारी संघ, भाजप बेस्ट कामगार संघ, बेस्ट जागृत कामगार घटना संघटना सहभागी होणार आहेत.