
मुंबई (विषेश प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना मंगळवार ३१ ऑक्टोबर २०१७ मोफत बेस्ट पास देण्यात येणार आहे. शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याहस्ते मोफत बस पासचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी पालिका अर्थसंकल्पात २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या सध्या ११९५ शाळा आहेत. यामध्ये पहिली ते दहावीच्या वर्गांमध्ये ३ लाख ३५ हजार ९३७ विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये शिकणारी बहुतांशी विद्यार्थी हे गोरगरीब कुटुंबातील असतात. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिकेच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्याचे आश्वासन शिवसेनेच्या वचननाम्यात देण्यात आले होते. त्यानुसार शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्या पाठपुराव्यामुळे ही योजना मार्गी लागली आहे. १ नोव्हेंबरपासून ‘बेस्ट’च्या २५ आगारांमधून ६९०३ विद्यार्थ्यांना मोफत ‘बेस्ट’ बस पास देण्यात येणार आहेत. पालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्याच विद्यार्थ्यांना मोफत पास योजना लागू होईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.