मुंबई : बेस्ट कामगारांचे वेतन आता २४ मार्चला होईल, असे नवे आश्वासन बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आले आहे. या आधी पगार १५ मार्च ला करू अशी ग्वाही खुद्द अशी ग्वाही बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी दिली होती. दरम्यान, रखडलेल्या वेतनामुळे बेस्ट कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. संतप्त झालेल्या कामगारांनी आज बॅक बे आगारात बेस्ट वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले. असंख्य कामगार यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते.
पंधरवडा संपला तरी कामगारांना वेतन मिळालेले नाही. बेस्टमधील कामगार संघटनांनी याविरोधात आवाज उठविल्यानंतर बेस्टला जाग आली आहे. येत्या २४ मार्चला बेस्ट कामगारांना पगार देण्यात येईल, अशी ग्वाही महाव्यवस्थापक पाटील यांनी दिली आहे. त्यासाठी १६० कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बेस्टवर २८ फेब्रुवारीपर्यंत १ हजार ८७२ कोटींचे कर्ज आहे. बेस्ट यापूर्वी ११.५० टक्के व्याजदराने कर्ज घेत होते. आता ८.८ टक्के दराने कर्ज घेत आहे. कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात अाहेत. उत्पन्न वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
३१ मार्चपर्यंत बेस्ट १६० कोटी ९० लाख रुपयांपर्यंत तोट्यात असू शकते. बेस्ट समित्यांच्या फेब्रुवारी महिन्याच्या पगारासाठी ८४.३६ कोटी रुपये लागणार आहेत. अन्य बाबींसाठी ६.४० कोटी रुपये लागणार आहे. तसेच महापालिकेला आतापर्यंत व्याजापोटी ४५.३७ कोटी रुपये देणे आहे. सध्या अंदाजे १३६.१३ कोटींची व्यवस्था करावी लागणार आहे, पाटील यांनी स्पष्ट केले.
>>>>>>>>>>>>>
“फेब्रुवारीचा पगार २४ मार्चला होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मुंबईसाठी अहोरात्र काम करणार बेस्टचा कर्मचारी तीव्र आर्थिक संकटात सापडला. प्रशासनाने लवकरात थकीत वेतन द्यावे. कामगारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.”- रुपेश पाटील, उपाध्यक्ष, बेस्ट वर्कर्स युनियन