मुंबई, (निसार अली) : मालवणी आगाराहून पवई-हिरानंदानी पर्यंत निघालेल्या ३५९ क्रमांकाच्या बेस्ट बसमध्ये आज सकाळी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ती मध्येच थांबवावी लागली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. बसचा क्रमांक एमएच-०१/एलए ५३६७ असा आहे.
काचपाडा सिग्नलजवळ येताच बसच्या रेडिऐटरमध्ये असणारे पाणी अचानक उकळू लागले आणि चालकासमोर धूर येऊ लागला. चालकाचे त्वरीत प्रसंगवधान दाखवत बस रस्त्याच्या कडेला घेवून बंद केली. तरिही पाणी उकळत होते. यावेळी बसमधील तापमापक १२० अंश सेल्सिअस तापमान दाखवत होते.
बस बंद झाल्याने प्रवाशांना काचपाडा येथे उतरावे लागले आणि दुसरी बस येईपर्यंत वाट पाहावी लागली. या ठिकाणी मालाड लिंकरोडवर मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीही झाली होती. त्यामुळे प्रवासी बेस्ट प्रशासनावर वैतागले होते.
अचानक हा प्रकार घडल्याने आमचा वेळ वाया गेला. त्यामुळे कार्यालयात वेळेवर पोहोचणे अशक्य झाले, बेस्टने दुसर्या बसची तातडीने व्यवस्था करायला हवी, असे एका प्रवाशाने सांगितले.
रेडिएटरचे पाणी गरम होऊन उकळत असल्याने बस या ठिकाणी थांबवावी लागली. या बाबत आगारातील अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे, अशी माहिती बेस्टच्या बसचालकाने दिली.