मुंबई : मुंबईतील सर्व उपहारगृहांची सोमवारपासून झाडाझडती घेऊन पुन्हा धडाक्यात कारवाईला सुरुवात होणार आहे. कोणालाही क्लिनचीट दिली जाणार नाही. यावेळी अग्निशमन यंत्रणेतील त्रूटी आढळून येतील, अशा हॉटेलांना नोटीसा न देता महाराष्ट्र फायर सर्विसेस एक्ट अंतर्गत सील ठोकले जाईल. रस्ते व नालेसफाईप्रमाणेच ही सफाई करणार आहे, अशी ठाम भूमिका पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सभागृहात मांडली. गच्चीवरील हॉटेल धोरणाचे यावेळी त्यांनी जोरदार समर्थन केले.
कमला मिल दुर्घटनेप्रकरणी विरोधीपक्षनेते रवी राजा यांनी शुक्रवारी पालिका सभागृहात निवेदन मांडून प्रशासनाच्या कामाकाजावर हल्ला चढवला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी ही प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत चीड व्यक्त केली. प्रशासनाकडून यावर खुलासा देताना, पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व प्रश्नांना उत्तरे देत, मुंबईतील बेकायदेशीर बांधकांमाबाबत यापुढील कारवाईची भूमिका स्पष्ट केली. आग दुर्घटनेनंतर कारवाईबाबत एका राजकीय नेत्याने विरोध केला. शिवाय मोठ्या आवाजात विचारले तुम्ही कशी काय कारवाई करता? पण कारवाई करताना मी मागे हटणारा नाही. ऐकणार सर्वांचे व कायद्याचे करणार हे माझे तत्व आहे. त्यामुळेच मी येथील १७ अनधिकृत बांधकामे तोडली व यापुढे तोडत राहणार, असा छाती ठोक दावा केला. तसेच त्या राजकीय नेत्याचे नाव सांगणार नाही, ते नाव विरोधी पक्षनेत्यांनी शोधावे, असा टोलाही राजा यांना लगावला. येत्या १५ दिवसांत नियमबाह्य बांधकाम, अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर कारवाई करणार असून कोणालाही सुट दिली जाणार नाही. अग्निसुरक्षा नियमांची पुर्तता केली की नाही, आणि निरंतर पाहणी करण्यासंदर्भात ३४ अग्निसुरक्षा केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. या केंद्रामार्फत दोन दिवसात अग्निसुरक्षा कायदा अंमलबजावणी करण्यासंदर्भात पहाणी केली जाईल. अग्निसुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या आस्थापना, हॉटेल तात्काळ बंद केली जातील. कोणतीही झोपडपट्टी असली तरी कारवाईचे अधिकार पालिकेला असून त्याची अंमलबजावणी केली जाईल. अग्निसुरक्षा केंद्राच्या कामकाजाला सोमवारपासून सुरुवात होणार असून हॉटेल, रेस्टोरंन्ट, आस्थापनामध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा नसल्यास थेट कारवाई करुन त्यांना सील ठोकले जाईल. यावेळी कोणतेही नोटीस दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका आयुक्तांनी मांडली. तसेच आग दुर्घटनेनंतर पाच अधिकाऱ्यांना निंलबित केले. याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यात दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. यातून कोणालाही क्लिनचीट दिली जाणार नाही. शिवाय, यापुढे हॉटेलांमध्ये निवासाला पूर्णतः मनाई केली असून तसे आढळून आल्यास नियमानुसार संबंधितावर कारवाई केली जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. यावेळी गच्चीवरील हॉटेल धोरणाचे समर्थन केले.