अलिबाग : गणेशत्सवासाठी राज्यातील विविध भागातून मोठ्याप्रमाणात गणेशभक्त कोकणात येत असतात. या भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी पुर्ण करावी, असे निर्देश आज सार्वजनिक बांधकाम (सा.उ.वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. सायन-पनवेल, पनवेल ते पोलादपूर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग पाहणी दौऱ्या प्रसंगी ते अधिकाऱ्यांशी बोलत होते.
यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, निरंजन डावखरे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपविभागीय अधिकारी पनवेल दत्तू नवले, उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार दीपक आकडे, अजय पाटणे तसेच नॅशनल हायवे, बांधकाम विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सुचना करताना ते म्हणाले की, गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविले जावेत जेणेकरुन गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होईल. पोलीस विभागाने गणेशोत्सव काळात महामार्गावरील वाहतूक सुरळपणे होईल ते पहावे. कर्नाळा अभयारण्याजवळ महामार्गाच्या कामात येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे. महामार्गाच्या कामात विविध टेक्नॉलॉजीचा वापर करुन रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
पाटील यांनी पनवेल येथून सकाळी साडेआठ वाजता पाहणीस सुरुवात केली. त्यानंतर वाशी नाका, वडखळ नाका या दरम्यान विविध ठिकाणी थांबून रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी स्थानिक रहिवाशांची देखील चर्चा केली.