
नाशिक (प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात दिनांक ११ ते १७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान मधुमक्षिका पालन व व्यवस्थापन या विषयावरील प्रशिक्षण संपन्न झाले. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रशिक्षणाचा राज्यातील सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, नांदेड, कोल्हापूर, नागपूर, नंदुरबार, मुंबई तसेच पुणे या जिल्ह्यांमधून आलेल्या ५० प्रशिक्षणार्थींनी लाभ घेतला.
सात दिवसांच्या या प्रशिक्षणात मधुमक्षिकांचे जीवशास्त्र, रोग-कीड व्यवस्थापन, मधुपेटीतील कामकाज, राणी मधुमक्षिकेचे महत्त्व, मध निर्मिती प्रक्रिया, मध संकलन तंत्रज्ञान, मधाचे मूल्यवर्धन, गुणवत्ता तपासणी, तसेच आधुनिक उपकरणे वापरून वैज्ञानिक पद्धतीने मधुमक्षिका पालन कसे करावे याची सविस्तर माहिती देण्यात आली. शास्त्रशुद्ध पद्धतीने मधुमक्षिका पालन केल्यास पिक उत्पादन क्षमता वाढते तसेच पूरक उत्पन्नाचे नवे मार्ग कसे खुलतात यावर प्रशिक्षणात विशेष भर देण्यात आला. प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे मधपेटी तपासणी, वसाहत व्यवस्थापन, परागीकरणाचे महत्त्व, मध संकलन प्रक्रिया, तसेच व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागात आणि शहरी स्तरावर मधुमक्षिका पालन मोठ्या प्रमाणात व्यवसाय व रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतो, असे मत मार्गदर्शक तज्ज्ञांनी व्यक्त केले.















