मुंबई : वरळी,ना.म.जोशी मार्ग व नायगाव येथील बी.डी.डी.चाळींच्या ,मनमानीपणे केलेल्या नामकरणाविरोधात वरळीतील तमाम आंबेडकरी,डाव्या पुरोगामी संस्था,संघटना व व्यक्तींच्या वतीने वरळी बी.डी.डी.चाळ क्र.९३/९४ समोरील जयभिम स्तंभाजवळ आज दि.४ जून रोजी सायंकाळी ४ वा.तीव्र निदर्शने करण्यात आली.
बी.डी.डी चाळ नामांतरास विरोध करताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मध्य-मुंबई तालुक्याचे सेक्रेटरी काम्रेड अशोक पवार ,तृप्ती निकाळजे,प्रविण भास्कर मांजलकर व इतर आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतले.
या निषेध निदर्शनात जाती अंत संघर्ष समिती,महाराष्ट्र ,दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती ,भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ ( DYFI ),स्टुडंट्स फेडरेशन आॕफ इंडिया ( SFI ),अ.भा.जनवादी महीला संघटना,व वरळीतील आंबेडकरी,पुरोगामी नागरिक ,बी.डी.डी.चाळीतील स्थानिक महीला व पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शासनाने केलेल्या नामकरणास विरोध व्यक्त करून या निर्णयाचा निषेध करीत असतानाच पोलिसांनी आंदोलकाना ताब्यात घेतले.आयोजकांनी पोलीसांच्या या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला.
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासानंतर बाळासाहेब ठाकरे,राजीव गांधी व शरद पवार नगर या नामकरणाचा शासन निर्णय राज्य शासनाने मागे न घेतल्यास वरळी ,नायगाव,ना.म.जोशी मार्ग बी.डी.डी.चाळीतील जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा निश्चय आंदोलकांनी जाहीर केला.
या निदर्शनाचे नेतृत्व जाती अंत संघर्ष समितीचे महाराष्ट्राचे निमंत्रक शैलेंद्र कांबळे,अशोक पवार, DYFI तृप्ती निकाळजे,प्रविण भास्कर मांजलकर ,दलित पँथर सुवर्ण महोत्सव समितीचे अमोल निकाळजे व सहकारी यांनी केले.















