
मुंबई : बी.डी.डी.चाळींच्या मनमानी नामकरणाविरोधात आज शनिवार दि.४ मे २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता
म्हाडा साईट आॕफीस,वरळी बी.डी.डी.चाळ येथे निदर्शने करण्यात येणार आहेत.
मुंबईतील वरळी,नायगाव,ना.म.जोशी मार्ग या संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसेच गिरणी कामगार व दलित चळवळीचा वारसा असणाऱ्या विभागातील बी.डी.डी.चाळींना अनुक्रमे दिवं.बाळासाहेब ठाकरे,दिवं.राजीव गांधी,व शरद पवार यांची नावे देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला आहे. जाती अंत संघर्ष समिती,महाराष्ट्र ,दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती,भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ ( DYFI ),तसेच मुंबतील आंबेडकरी व डाव्या पुरोगामी संघटनांनी या शासन निर्णयास विरोध केला आहे.
कोणतीही चर्चा न करता,व या परिसराची सामाजिक,सांस्कृतिक,पार्श्वभूमी ध्यानात न घेतला गेलेला हा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा, अशी मागणी
शैलेंद्र कांबळे,प्रविण भास्कर मांजलकर,अशोक पवार,सुबोध मोरे,अमोल निकाळजे,प्रमिला मांजलकर,तृप्ती निकाळजे,सुप्रीया कांबळे,रमेश तडके,विठ्ठल घाग,हरिष गायकवाड आदींनी केली आहे.
या संपूर्ण परिसरात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आकाराला येऊन कामगारांनी ती चळवळ प्राणाची बाजी लावून लढवली व काॕंग्रेसी सत्ताधाऱ्यांच्या जबड्यात हात घालून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविल्याचा इतिहास सर्वश्रृत आहे. असे असताना या परिसराची सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात न घेता सरकारने परस्पर व एकतर्फी ही नावे घोषीत करणे योग्य नसल्याचे या संघटनांनी सांगितले.
भारतीय संविधानाचे शिल्पकार व भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर ,श्रीपाद अमृत डांगे,आचार्य अत्रे,रणरागीणी अहील्याताई रांगणेकर,एस एम जोशी, पी.के.कुरणे, प्रबोधनकार ठाकरे ,भंडारे अशा मातब्बर पुढाऱ्यांचा या संपूर्ण परिसरात संघर्षाचा इतिहास असताना या नावांची साधी चर्चा ही न करता नामकरण करणे म्हणजे सत्ताधाऱ्यांची हुकुमशाहीच म्हणावी लागेल, असा आरोप या संघटनांनी केला.















