मुंबापुरीत चाळ संस्कृती नामशेष होत चालली आहे. उंच उंच इमारती चाळींच्या जागी बांधल्या जात आहेत. जुन्या चाळी, तेथील प्रेमळ माणसे, सुख-दुख एकामेंकासोबत वाटणे, मदतीला धावून जाणे याबाबत आजही खरा मुंबईकर भरभरून बोलतो आणि आठवणींनी डोळ्यांच्या कडा ओल्याही करतो. या पार्श्वभूमीवर चाळसंस्कृती म्हणजे काय? हे युवा पिढीला समजण्यासाठी लेखक पु.ल. देशपांडे यांचे ’बटाट्याची चाळ’ हे पुस्तक महत्वाचे ठरते.
दिवंगत लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे अवघ्या महाराष्ट्राला पु. ल. या नावाने परिचित. महाराष्ट्राने त्यांच्या साहित्य कृतींवर भरभरून प्रेम केले. ते साहित्याच्या सर्वच क्षेत्रात वावरले. त्यांनी नाटके लिहिली. एकपात्री प्रयोग केले. त्यांनी लिहिलेल्या बटाट्याची चाळीने साहित्य क्षेत्रात विशेष ठसा उमटविला.
प्रत्येक समाजाचे सांस्कृतिक वैभव दाखवणाऱ्या काही गोष्टी असतात. पु. ल. नी बटाटयाच्या चाळीतील इरसाल व्यक्तींना हाताशी धरून अक्षरशः चाळीची बखर लिहिली आहे. या बखरीने चाळीचे विश्वच उभे केले आहे. ज्यात सांस्कृतिक चळवळ, भ्रमणमंडळ, निष्काम साहित्यसेवा, गच्चीसह झालीच पाहिजे आदी १२ प्रकरणांचा समावेश आहे.
पु. ल यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि त्यातून पुढे आलेली व्यक्तिचित्रे मग ती सोकाजी दादा त्रिलोकेकर असो किंवा मग आचार्य बाबा बर्वे, अण्णा पावशे, राघू नाना सोमण, कोचरेकर मास्तर, काशिनाथ नाडकर्णी असो सर्वानीच वाचकांना आणि रसिक प्रेक्षकांना मनमुराद हसवलं आहे.
१९५८ साली बटाट्याची चाळ पहिल्यांदा प्रकाशीत झाली. त्यानंतर या पुस्तकाच्या आवृत्यांवर आवृत्या निघाल्या. आजच्या इंटरनेटच्या जमान्यातही हे पुस्तक वाचकप्रिय आहे. म्हणजेच बटाट्याची चाळीची जादू आजही कायम आहे.
पु ल यांचं लिखाण हे विनोदाला विनोद या स्वरूपाचा नसून ते व्यक्तींचे दोष सुद्धा वाचकांसमोर आणतात. व्यक्तींच्या स्वभावाला ते विनोदाचे पांघरूण घालतात. तेव्हा अशी ही बटाटयाची चाळ तिच्या शेवटच्या टप्प्यात ‘एक चिंतन’ वाचताना डोळ्यात अश्रू उभे करते. वाचताना हुंदका अनावर होतो. शेवटी, ही बटाट्याची चाळ आणि चाळीत ज्यांनी आयुष्य काढले; त्या सर्वांसाठीच हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवावा असा खास ठेवा झाला आहे.
पुस्तकाचे नाव : बटाट्याची चाळ
लेखक : देशपांडे पु. ल.
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह