मुंबई, दि.4 : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) यांच्या विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात दि. 5 ते 20 जून 2021 या कालावधीमध्ये बार्टी अंतर्गत समतादूत प्रकल्पाद्वारे वृक्षारोपण पंधरवड्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव, प्राणवायूची होत असलेली कमतरता आणि वाढते प्रदूषण पाहता पर्यावरणाचे रक्षण करणे महत्वाचे झाले आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यात समतादुतांमार्फत कडुलिंब, वड, पिंपळ, आंबा, चिंच इत्यादी मोठ्या वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून हे सर्व वृक्ष प्राणवायू व सावली देणारे आहेत.
या पंधरवड्यात जे समतादूत जास्तीत जास्त रोपे लावतील व त्यांचे चांगल्याप्रकारे संगोपन करतील त्यांना जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर पारितोषिके दिली जाणार आहेत. जागतिक पर्यावरण दिनी 5 हजार वृक्ष लागवड करण्याचे लक्षांक आहे. तसेच पूर्ण वृक्षारोपण पंधरवड्यात एकूण 50 हजार पर्यंत झाडे लावण्याचा बार्टीचा मानस आहे. बार्टीचे समतादूत हे लोकसहभागातून राज्यातील सर्व तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करीत आहेत तरी प्रत्येक व्यक्तीने किमान 1 किंवा त्यापेक्षा जास्त झाडे लावावीत व त्याचे संगोपन करावे त्याबाबत बार्टीकडून सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेण्याकरिता 9404999453/9404999452 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.