राजापूर : बारसू येथे प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे या मागणीसाठी व या प्रकल्पाला असलेल्या समर्थनाची ताकद दाखविण्यासाठी काज राजापुरात भव्य रिफायनरी समर्थन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता बंदरधक्का येथे एकत्र जमून तेथून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. जवाहर चौकात येऊन समर्थकांची शक्ती व संघटन दाखवतानच रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे असा नारा देण्यात येणार आहे.
राजापूर शहरातील बंदरधक्का येथून या समर्थन मोर्चाला प्रारंभ होणार असून तो जवाहर चौकात येणार आहे. तेथे या समर्थन मोर्चाला उपस्थित सर्व मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या समर्थन मोर्चाला केंद्रीय उद्योगमंत्री ना. नारायण राणे, उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांसह सर्व पक्षिय समर्थक लोकप्रतिनिधी उपस्थित रहाणार असल्याची माहिती भाजपा तालुका अध्यक्ष अभिजित गुरव, शिवसेना तालुका प्रमुख अशफाक हाजू व रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीचे नेते हनिफ मुसा काझी यांनी दिली आहे.
या समर्थन मोर्चाला राजापूर शहरसह ग्रामीण भागातील सर्व समर्थक, विविध सामाजिक संघटना व त्यांचे पदाधिकारी विविध वाहतुक संघटना, व्यापारी संघटना, आंबा बागायतदार असे हजारो लोक उपस्थित रहाणार आहेत. अत्यंत शांततापुर्ण वातावरणात हा मोर्चा काढला जाणार आहे.
आमचा कोणालाही विरोध नाही तर कशा प्रकारे हा प्रकल्प तालुका, जिल्हा, राज्य आणि देशाच्या विकासात महत्वाचा ठरू शकतो हे सांगतानाच् समर्थनाची शक्ती किती मोठी आहे हे दाखवून देण्यासाठी हा समर्थन मोर्चा असल्याचे निलेश राणे यांनी गुरूवारीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे शनिवारी समर्थकांची शक्ती दिसून येईल असेही गुरव, हाजू व काझी यांनी सांगितले.