
रत्नागिरी : शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच बारसू प्रकल्प पुढे नेला जाईल असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. ते आज रत्नागिरीत शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
याबाबत बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, रिफायनरीच्या दृष्टीने बारसूमध्ये सुरू असलेलं माती परीक्षण अंतिम टप्प्यात आलेलं आहे. येत्या तीन-चार दिवसात माती परीक्षणासाठी मारण्यात येणारे बोर मारून पूर्ण होतील. त्यानंतर माती परीक्षण होईल, माती परीक्षणाचा अहवाल आल्यानंतरच या प्रकल्पाचा निकाल लागेल, की हा प्रकल्प कशा पद्धतीने होणार आहे, कुठे होणार आहे, हे कंपनीवाले सांगतील.
दरम्यान तिथल्या लोकांवर पोलिसी दबाव आणून कुठेही काम करण्याची कोणाचीही इच्छा नाही, परंतु कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं काही लोकांनी करू नये असं देखील मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले. तसेच मुंबईतून लोकांनी इथे येऊन लोकांना भडकवू नये, याबाबत मी स्वतः मुंबईच्या कमिटीशी बोलणार आहे, शरद पवार साहेब देखील त्या कमिटीशी बोलणार आहेत, वेळ पडली तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील त्या कमिटीशी बोलतील, परंतु मी पुन्हा पुन्हा सांगतोय की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच बारसू प्रकल्प पुढे नेला जाईल, असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
कातळशिल्प शेतकऱ्यांकडेच राहतील, ती विकसित केली जातील – मंत्री सामंत
कातळशिल्पाबाबत बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, बारसूच्या कातळशिल्पांबाबत अतिशय मोठा गैरसमज आहे. कातळशिल्प यामध्ये घेण्यासंदर्भात कुठलाही विचार नाही, कातळशिल्प हे एमआयडीसी अधिग्रहित करणार नाही, कातळशिल्प हे शेतकऱ्यांकडेच राहतील. त्यानंतर सरकार किंवा कंपनीच्या माध्यमातून ही कातळशिल्प विकसित केली जातील, ते पर्यटन स्थळ बनवलं जाईल, आणि त्या पर्यटनाच्या माध्यमातून जे उत्पन्न येईल ते देखील त्या शेतकऱ्यांना दिलं जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.