मुंबई : महापालिकेच्या जोसेफ बाप्टीस्टा या उदयानात लवकरच जगातील ७ आश्चर्यांच्या प्रतिकृती स्थापित करण्यात येणार आहेत. यामुळे या उद्यानाचे रुपडे बदलण्यासोबतच जगातील ७ आश्चर्यांना जवळून पाहिल्याचा आनंद लहानांसोबतच मोठ्यांनाही घेता येणार आहे.
दक्षिण मुंबईतील भंडारवाडा टेकडीवरील हे उद्यान अभ्यास विद्यार्थ्यांचे एक आवडीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. या उद्यानातून दिसणारे दक्षिण मुंबईचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक देखील या उद्यानाला भेट देत असतात.
७ आश्चर्याचे उद्यान उभारण्याची संकल्पना माजी नगरसेविका यामिनी यशवंत जाधव या़ंची आहे. त्यांच्या व सभागृह नेते यशवंत जाधव यांच्या प्रयत्नातून हि संकल्पना साकारली जात आहे.
जोसेफ बाप्टीस्टा उद्यानामध्ये या ७ प्रतिकृतींसह उद्यानविषयक काही कामे देखील केली जाणार आहेत.या सर्व कामांसाठी साधारणपणे २ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती महापालिकेच्या उद्यान कक्षाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.
महापालिकेच्या ‘इ’ विभाग कार्यक्षेत्रातील माझगांव परिसरात डॉकयार्ड रेल्वे स्टेशनच्या जवळ महापालिकेचे हे उद्यान आहे. समुद्रसपाटीपासून साधारणपणे १०० फूटांपेक्षा अधिक उंच असणा-या टेकडीच्या माथ्यावर असणारे हे उद्यान सुमारे ५ लाख ४४ हजार चौरस फुटांच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेले आहे. मुंबईतील सर्वात जुन्या उद्यानांपैकी एक असणा-या या उद्यानामध्ये वेगवेगळ्या प्रजातींची फळझाडे, फूलझाडे, वेली आहेत. उद्यानातून दिसणा-या दक्षिण मुंबईच्या विहंगम दृश्यासह इथे असणारा छोटा कृत्रिम धबधबा देखील पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे.
या उद्यानातील आकर्षणांमध्ये आता जगातील ७ आश्चर्यांच्या प्रतिकृतींची भर पडणार आहे. यामध्ये ब्राझिल देशातील रिओ शहरातील येशू ख्रिस्तांचा पुतळा, इटली मधील पिसा शहरातील कलता मनोरा अमरिकेतील न्यूयॉर्क शहरातील स्वातंत्र्य देवतेचे पुतळा, कमानकला व स्थापत्य अभियांत्रिकीचे एक श्रेष्ठ उदाहरण मानल्या जाणा-या इटलीतील रोम शहरातील कलोसियम या खुल्या सभागृहाचा समावेश आहे. याचबरोबर फ्रान्स मधील पॅरीस शहरातील आयफेल टॉवर, पुरातन संस्कृतीशी नाते सांगणारा मेक्सिको देशातल्या टिनम शहरातील चिनचेन इत्झा पिरॅमिड आणि आपल्या भारतातील आग्रा शहरातील ताजमहालाच्या प्रतिकृतींचाही यात समावेश असणार आहे.
महापालिकेच्या या उद्यानात उभारण्यात येणा-या ७ आश्चर्यांच्या प्रतिकृतींच्या जवळ संबंधित मूळ ठिकाणाची माहिती व वैशिष्ट्ये सांगणारे फलक बसविण्यात येणार आहेत. तसेच प्रतिकृतींच्या सभोवताली रंग बदलणारे एल.ई.डी. प्रकारातील दिवे देखील बसविण्यात येणार आहेत. या दिव्यांमुळे सांयकाळच्या वा रात्रीच्या वेळी या प्रतिकृतींचे सौंदर्य अधिक खुलून दिसणार आहे. उद्यानातील ज्या ठिकाणी या प्रतिकृती बसविण्यात येणार आहेत, त्या भागातील उद्यानविषयक बाबींचेही अनुरुपीकरण केले जाणार आहे. या सर्व कामांसाठी साधारणपणे २ कोटी ६ लाख रुपयांचा खर्च अंदाजित आहे. कार्यादेश दिल्यानंतर साधारणपणे ६ महिन्यात हे काम पूर्ण होणे अपेक्षित असून कार्यादेश देण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यानुसार हे काम साधारणपणेमे २०१८ पर्यंत होण्याचा अंदाज आहे