नागपूर, 15 June : जलालखेडा तालुक्यातील पिंपळखेडा येथील अरविंद बन्सोड यांच्या मृत्यूप्रकरणी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बन्सोड कुटुंबीयाला आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते एक लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला.
विभागीय आयुक्त कार्यालयात या प्रकरणासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संपूर्ण चौकशी करुन बन्सोड कुटुंबाला न्याय देण्यात येईल, तसेच आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यान्वये या प्रकरणात शासनातर्फे चार लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्यात येते.
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब देशमुख, जनार्दन बन्सोड, किशोर जनार्दन बन्सोड यावेळी उपस्थित होते.