
संग्रहीत छायाचित्र
मुंबई, 15 जून : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी आज सोमवारपासून काही प्रमाणात लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, या लोकलमधून ज्या कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे, त्यात बँक कर्मचाऱ्यांचा उल्लेख नाही. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जनता दल सेक्युलरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
देशाची आर्थिक वाटचाल सुरळीत चालू राहण्याच्या दृष्टीने बँकांचे महत्त्व विशेष आहे. त्यामुळेच लाॅकडाऊनच्या काळातही बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या. परंतु, ये-जा करताना कर्मचाऱ्यांची मोठी अडचण होते, त्यामुळे अनेक कर्मचारी आठवडाभर कामाच्या ठिकाणीच राहतात व साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीच घरी परततात. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येत आहेत.
परंतु, आज सोमवारपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी काही प्रमाणात लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, या लोकलमधून ज्या कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे, त्यात बँक कर्मचाऱ्यांचा उल्लेख नाही. हा कोरोनाचा धोका पत्करूनही लाॅकडाऊनच्या काळात कामावर येणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांवरील अन्याय आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करून बँक कर्मचाऱ्यांनाही लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी. त्यासाठी आवश्यक असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करावी, अशी मागणी जनता दल से. मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी केली आहे.














