मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : भांडुप पश्चिम येथील श्री राम पाडाजवळ सोमवारी घडलेल्या वाहन जळीतकांडामुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी हनुमान मंदिर समोरील वाहनांना आग लावली. अकरा मोटार सायकली आणि दोन मोटारी यात जळाल्या. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी सांगितले.
विभागातील रहिवाशांना आग लागल्याचे समजताच त्यांनी इतर मोटार सायकली बाजूला केल्या आणि पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन बंब पोहचण्याआधीच अकरा दुचाकी आणि एक मोटार कार जळाली. तर एका मोटारीचा काही भाग जळाला. जळालेल्या वाहनांत काही वाहने नव्यानेच विकत घेण्यात आली होती.