रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): गुहागर तालुक्यातील वेळंब येथे रत्नागिरीच्या गुन्हा अन्वेषण शाखेने धाड टाकुन एका लोहाराच्या कारखान्यात जवळपास तयार झालेल्या तीन बंदुका व बंदुका बनविण्याचे साहित्य असा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त केला असुन गुहागर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या संबंधी शस्त्र बनविणाऱ्या रमेश शंकर काताळकर (४९) यास अटक करण्यात आली आहे.
वेळंब येथे रमेश शंकर काताळकर हा बंदुका दुरूस्त करतो, नवीन बंदुका व बंदुकीचे साहित्य तयार करतो अशी खबर गुन्हा अन्वेषण खात्याला लागली होती. त्यानुसार दि. ११ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास गुन्हा अन्वेषण खात्याच्या पथकाने वेळंब येथे काताळकर याच्या लोहार कामाच्या दुकानावर धाड टाकली. कोणत्याही प्रकारचा शस्त्र बनविण्याचा व दुरूस्ती करण्याचा परवाना नसताना या ठिकाणी बेकायदेशीर बंदुकीचे साहित्य आढळुन आले. पोलीस पथकाला या ठिकाणी जवळपास तयार झालेल्या दोन सिंगल बॅरल बंदुका व एक तयार होत असलेली डबल बॅरल बंदुक आढळुन आली. त्याच प्रमाणे बंदुकीचे इतर सामान व तयार करण्याचे साहित्य असे मिळुन एकुण १० प्रकारचे साहित्य पोलीसांनी जप्त केले व गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कलम ५/ २५(१) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन रमेश शंकर काताळकर यास अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणीस, पो. उपनिरीक्षक माने, पो. हे. कॉ. दिनेश आखाडे, वाघे, वाहन चालक तांबे या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
वेळंंब येथील रमेश शंकर काताळकर याच्या या कारखान्यावर २००८ ला स्थानिक गुन्हा अन्वेषण रत्नागिरी या पथकाने धाड टाकुन अशाच प्रकारचा मुद्देमाल जप्त केला होता. व रमेश शंकर काताळकर याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतरही रमेश काताळकर याने अशा प्रकारच्या बेकायदेशीर बंदुका बनविणे थांबविले नव्हते. त्याची खबर रत्नागिरी पोलीसांना मिळाल्या नंतर पोलीसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी अधिक तपास गुहागर पोलीस करीत आहेत.