मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : मालाड पश्चिम येथे एक वर्षाच्या बालकाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. विवान संदिप कांदू असे बालकाचे नाव आहे. सोमवारी तो स्वत:च्या घरातून बेपत्ता झाला होता. प्लास्टीकच्या एका पिशवीत मंगळवारी त्याचा मृतदेह आढळून आला. मालाड पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्ति विरोधात अपहरण व हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.
मालाड पश्चिम, काचपाडा क्रमांक१ या ठिकाणी संदिप कांदू (३२) कुटुंबासह राहतात. संदीप यांचे या परिसरात एक छोटे दुकानही अाहे. त्यांना एक वर्षाचा विवान व ८ महिन्यांचा एक मुलगा अाहे. साेमवारी ते गाढ झाेपेत असताना अचानक विवान बेपत्ता झाला. सकाळी उठल्यानंतर कुटुंबियांनी विवानचा शाेध घेण्यास सुरुवात केली. शाेध घेतल्यानंतरही तो सापडत नसल्याने मालाड पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी श्वान पथकासह विवानचा शोध सुरू केला. मंगळवारी काचपाडा नं. १ येथे एका प्लास्टिक पिशवीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी पाहणी केली असता विवानचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत आढळला. ही हत्या संपत्तीच्या वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे