
बाळासाहेबांना जाऊन अकरा वर्षे पुर्ण होऊनही त्यांच्या समाधिस्थळी आजही नतमस्तक होताना त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते….आणि ह्रदयातील आठवणी फेसाळत शब्दरूपाने बाहेर पडल्यात…
यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत |
अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं
सुजाम्यहम
परित्राणाय साधुनाम | विनाशायच
दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||
भगवान श्रीकृष्णाने धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानि येईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईन धर्माच्या रक्षणासाठी माझा अवतार असेल या न्यायाने कलियुगात मराठी माणसांच्या रक्षणासाठी ज्यांनी अवतार धारण करून शिवसेना पक्षाची स्थापना केली, ते बाळासाहेब ठाकरे ओठात तेच पोटात आणि पोटात तेच ओठात असणारे परखड बाळासाहेब,! मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देणारे बाळासाहेब,! मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे बाळासाहेब,! अनेक दगडांना शेंदुर फासुन देवत्व बहाल करणारे निस्वार्थी निरपेक्ष बाळासाहेब,! प्रत्येक व्यक्तीला त्याची क्षमता ओळखुन एखाद्या कसलेल्या रत्नपारख्याच्या नजरेतुन पद देणारे बाळासाहेब! ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद उध्वस्त झाली तेव्हा भाजपाने त्याचे खापर शिवसेनेवर फोडले असता वाघाची डरकाळी फोडुन आपल्या शिवसैनिकांच्या बावनकशी हिंदुत्वाचा अभिमान बाळगणारे बाळासाहेब ! रामजन्मभूमी अयोध्येतील राम मंदिर ज्या स्वप्नासाठी आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत लढत राहिले ते बाळासाहेब ! बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे अशी गर्जना करणारे बाळासाहेब ! लेखनाची टिपण घेताना आपल्या पुढ्यातील खाद्यपदार्थ प्रेमाने खाऊ घालणारे बाळासाहेब ! कधी काही चुकलंच तर चार चौघात त्या चुकीवर बोट न दाखविता एकांतात कान पकडून चूक दाखविणारे बाळासाहेब ! विनायका परत असे वागू नकोस म्हणून डोक्यावरून प्रेमाने हात फिरविणारे बाळासाहेब ! आम्ही आमच्या तुरुंगातील सारे भारतीय कैदी सोडतो तुम्ही एक बाळ ठाकरे आमच्या ताब्यात द्या असं पाकिस्तानने ज्यांच्याबद्दल वक्तव्य केले ते कट्टर हिंदुत्व वादी बाळासाहेब! शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत फेरबदल करताना कार्यप्रमुख म्हणून उद्धवसाहेबांची निवड करताना मी आपल्यावर नेतृत्व लादणार नाही तर तुम्हाला उद्धवमध्ये नेतृत्वगुण दिसत असतील तरच बेलाशक स्विकारा असे कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना ठणकावुन सांगणारे बाळासाहेब ! नतमस्तक होताना डोळ्यात जमा होणारे अश्रु बाळासाहेबांच्या आठवणींने आजही थांबत नाहीत. . शिवसैनिक माझा प्राण, माझी संपत्ती, माझी उर्जा आहे असे सांगणाऱ्या बाळासाहेबांचे जीवन ही एक विधात्याने घडवलेली बासरी होती. त्याच्या एका फुंकरीने सजीव बनलेला देह त्या देहाच्या बासरीत परमेश्वराने हळुवार मनाची अशी नाजुक फुंकर घातली होती की त्या फुंकरीने माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाच्या हृदयाच्या व्यथादेखील नादमुग्ध बनुन गेल्या होत्या. तारुण्याने घातलेल्या फुंकरीने उन्मादक सुरांची आठवण याच बासरीतुन झाली आणि वार्धक्याच्या विकल श्वासांनी तीच बासरी अस्थिर सुरांची धनी बनली आणि अखेरीस तो सूर काळाच्या एका धीट फुंकरीने आसमंतात विरून गेला. मागे राहीली ती फक्त आठवण आणि माघारी राहिलं ते मोकळ आसन बाळासाहेबांचे कर्तृत्वच इतकं दैदिप्यमान आहे की ते आसन व्यापणाचं धारीष्ट्य कुणालाही होणार नाही. पित्यासम बाळासाहेबांचा मृत्यू हा माझ्यासाठी मोठा आघात होता. त्यांच्या आठवणीने माझे मन आजही कासावीस होतं . त्यांच्या फोटोपुढे नतमस्तक होताना माझ्या मनी दाटुन येणाऱ्या भावना माझ्याच शब्दातून ….
आभारी आहे देवा तुझा मी
दैवत मज बाळासाहेब भेटले
न संपणाऱ्या पितृप्रेमाची उणीव
भरून काढली वात्सल्य रुपाने !
जरी नाही भरविला पहीला घास
कधी त्यांनी मला वात्सल्याने
तरी तृप्त झाले वेडे मन माझे
त्यांच्या मायेच्या उबदार स्पर्शाने!
नाही घेतला जरि कधी मी
जन्म त्यांच्या प्रेमळ उदरी
त्यांच्या माझ्या स्नेहमय नात्याची
नाळ जोडली होती जन्मांतरीची!
नाही टाकले पहिले पाऊल
हात त्यांचा धरुनी मी कधी
तरी होऊनी दिपस्तंभ माझे
झाले मार्गदर्शकाचे धनी!
आभारी आहे देवा तुझा मी
दैवत असे तु मज दिलेस
जगावेगळ्या या नात्याचे
अनमोल धागे गुंफलेस !!
विनायक राऊत
शिवसेना नेते तथा सचिव
खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग