मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानाच्या जागेवर स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे बांधकाम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) करण्यात येणार असून त्यासाठी 100 कोटींचा खर्च करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानावर भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारक उभारणीसाठी “बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक” या संस्थेची नोंदणी यापूर्वीच करण्यात आली आहे. स्मारकाच्या उभारणीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक या संस्थेला महापौर बंगल्याची जागा भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे.
या स्मारकाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. सल्लागाराने अंदाजित केल्यानुसार प्रकल्पासाठी 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार, एमएमआरडीएकडून या स्मारकाचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच, त्यासाठी सुरुवातीस 100 कोटींचा खर्चदेखील एमएमआरडीएच्या निधीमधून करण्यात येईल. राज्य शासनाकडून स्मारकासाठी उपलब्ध करण्यात येणाऱ्या तरतूदीमधून या खर्चाची नंतर प्रतिपूर्ती करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.