मुंबई, विशेष प्रतिनिधी ः सरकारी कार्यालयांत जयंती साजरी करण्याबाबत थोर व्यक्ती, राष्ट्रपुरुषांची नवी ४१ नावांची यादी महाविकास आघाडी सरकारने जाहीर केली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे व वडील दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.
दरवर्षी राज्य सरकारतर्फे थोर व्यक्तींच्या नावांची आणि विविध प्रकारचे महत्त्वाचे दिवस यांची यादी जाहीर होते. ते दिवस आणि यादीतील थोर व्यक्तींची जयंती सरकारी कार्यालयात साजरी केली जाते. १५ डिसेंबरला २०२१ साठी ३७ दिवसांची यादी जाहीर केली होती. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती २३ जानेवारीला असताना राज्य सरकारने १४ जानेवारीला ४१ दिवसांची नवी यादी जाहीर केली. त्यात बाळासाहेब ठाकरे व प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच बाळशास्त्री जांभेकर आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नावही समाविष्ट करण्यात आले आहे.