मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोव्हेंबर २०१७ च्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी रोजी महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात आयोजित पूर्वतयारी बैठकीत महापौरांनी महापालिका अधिकाऱ्यांकडून तयारी कामांचा आढावा घेतला. यावेळी स्मृतीदिनानिमित्त कायमस्वरुपी ५० लाख रुपये निधींची महापालिका अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी उप महापौर हेमांगी वरळीकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता सभागृह नेता यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर, शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे, उप आयुक्त (परिमंडळ – २) नरेंद्र बर्डे, उप आयुक्त (शिक्षण) मिलिन सावंत, उप आयुक्त (सुधार) चंद्रशेखर चोरे, जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार, शिक्षणाधिकारी महेश पालकर हे मान्यवर उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी, महापौरांनी स्मृतीदिनानिमित्त याठिकाणी आवश्यक त्या सेवासुविधा पुरविण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या तयारी कामांचा आढावा घेतला. तर सभागृह नेता यशवंत जाधव यांनी याठिकाणी रुग्णवाहिकेची व्यवस्था, प्रथमोपचार केंद्र, पिण्याच्या पाण्याचा प्याऊची व्यवस्था, अभिवादनासाठी येणाऱ्या सैनिकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी छताची निर्मिती तसेच स्मृतीदिनानिमित्त कायमस्वरुपी ५० लाख रुपये निधींची महापालिका अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी केली. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी अतिरिक्त मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करणे तसेच परिसर प्रकाशमान राहील यासाठी अतिरिक्त लाईटची व्यवस्था करणे व शिवाजी पार्क मैदानातील अतिरिक्त गवत काढण्याची सूचना महापालिका अधिकाऱ्यांना केली.
दरम्यान, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन त्याप्रमाणे सर्व त्या सोयीसुविधा पुरविण्याचे आदेश संबधित महापालिका अधिकाऱ्यांना यावेळी दिले.