रत्नागिरी, (आरकेजी) : राजापूर तालुक्यातल्या नाणार परिसरामध्ये जगातील सर्वात मोठा ग्रीन रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाविरोधातील जनरेटा आता वाढत चालला आहे. त्यातच मनसे या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिकांच्या बाजूने उभी राहणार अशी शक्यता आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी आज नाणार पंचक्रोशीत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प नकोच अशी भूमिका ग्रामस्थानी नांदगावकर यांच्यासमोर मांडली.
रिफायनरी प्रकल्प ज्या ठिकाणी प्रस्तावित आहे, त्या ठिकाणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज जाऊन शेतकऱ्याशी संवाद साधला. कुंभवडे गावामध्ये यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी तसेच मच्छिमार जमले होते. यावेळी सभागृहामध्ये खुर्चीवर न बसता जमिनीवर बसून बाळा नांदगावकरानी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंचक्रोशीतील शेकडो महिलांसह जवळपास पाचशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रकल्पाला विरोध नेमका का आहे याबाबतची ग्रामस्थाची बाजू नांदगावकर यांनी यावेळी जाणून घेतली. प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात नकोच अशी भूमिका यावेळी सर्वांनी मांडली. दरम्यान या प्रकल्पासंदर्भात ग्रामस्थाची भूमिका तसेच या भेटीचा सर्व अहवाल मुंबईला जावून मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना दिला जाईल, त्यानंतरच पक्षप्रमुख राज ठाकरे हे आपली भूमिका जाहिर करतील असं बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
तसेच जानेवारी किंवा फेब्रुवारीत राज ठाकरे हे या भागात दौराही करतील अशीही माहिती नांदगावकर यांनी यावेळी दिली. विकासाच्या बाजूनी नेहमी मनसे आहे, मात्र लोकांवर लादून विकास होणार असेल तर त्याला विरोध केला जाईल आणि असा विकास नको असल्याची भावना नांदगावकर यांनी व्यक्त केली.
‘राजापूर बंद’ मनसे सहभागी होणार
रिफायनरी प्रकल्पाविरोधात शेतकरी तसेच मच्छिमारांना उद्या (गुरुवार) ‘राजापूर बंद’ची हाक दिली आहे आणि बंदमध्ये मनसे देखील सहभागी होणार आहे, अशी माहिती यावेळी बाळा नांदगावकर यांनी दिली.