मुंबई, (शांताराम गुडेकर) : रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज मुंबई या संस्थेने ५० वर्षापूर्वी बाल विकास विद्या मंदिर ही शाळा सुरू केली. या शाळेने विद्यार्थी-विद्यार्थींनी यांना घडविण्याचे महान कार्य केले आहे. शाळेचे शैक्षणिक यश कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काढले. बाल विकास विद्या मंदिर, जोगेश्वरी या शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. विलेपार्ले येथील मा.दीनानाथ नाट्यगृहात प्रचंड उत्साहात हा सोहळा पार पडला.
तावडे म्हणाले की, “मराठी माध्यमामध्ये आजही विद्यार्थी-विद्यार्थींनीनी संख्या टिकवून ठेवली आहे.यामध्येच बाल विकास शाळेचे यश सामावले आहे.राज्याच्या ग्रामीण भागामध्ये आता विद्यार्थी-विद्यार्थींनीचा कल इंग्रजी माध्यमातून पुन्हा मराठी माध्यमाकडे येऊ लागला आहे. ही बाब मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून समाधानकारक आहे.”
राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांचे चांगले परिणाम येणा-या काळामध्ये आपणास दिसून येतील असेही तावडे म्हणाले. शाळेच्या सुवर्ण महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. र.जि.म.ज्ञा.समाज खजिनदार मंगेश पंडित, उपकार्याध्यक्ष जनार्दन विश्वासराव आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या इयत्ता १ ली ते इयत्ता १० वीच्या वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थींनीनी कलागुणांचे दर्शन घडविले आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण विचारे, मुख्याध्यापिका नीला वर्तक व सर्व शिक्षक,विभागप्रमुख यांचा तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक सदस्य भास्कर कदम, माजी मुख्याध्यापिका मंगला शिंदे, सुधा दामले, विश्वासराव, निधी संकलनातील शिक्षक यांचा सत्कार उल्का विश्वासराव यांच्या हस्ते करण्यात आला.
विशेष अतिथी म्हणून माजी आमदार बाळ माने उपस्थित होते. सरचिटणीस विश्वनाथ सावंत यांनी प्रस्ताविक भाषणात संस्थेचा ५० वर्षांचा इतिहास उलगडवला. कार्याध्यक्ष मोतीराम विश्वासराव व अध्यक्ष श्रीकृष्ण विचारे यांनी संस्थेच्या योजनांबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका निलम साटम यांनी केले. संस्थेचे उपकार्याध्यक्ष व आरजेएमडीएस इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष सहदेव सावंत यांनी आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली.