मुंबई, दि. १६ : बकरी ईद लक्षात घेऊन राज्य सरकारने मुंबई महापालिकेला देवनार कत्तलखान्यात गरजेनुसार कुर्बानीची जनावरे कापून देण्याचे तसेच बकरे तसेच अन्य जनावरे मुंबईत आणण्यास परवानगी देण्याचे आदेश देण्याची मागणी जनता दल सेक्युलर मुंबई पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याकडे केली आहे.यावर्षी 20 जुलै रोजी बकरी ईद येत आहे. या इदनिमित्त तीन दिवस बकऱ्यांची व अन्य जनावरांची (मुख्यत: म्हैशीचे पाडे) कुर्बानी देण्याची मुस्लिम समाजात प्रथा आहे. मात्र, देवनार येथील कत्तलखाना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने मोठी अडचण होत आहे. त्याचबरोबर चेकनाक्यावरून मुंबईत जनावरे आणतानाही अनेक अडचणी येत असतात. या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार होत आहे. बकरे व अन्य जनावरे घेऊन येणाऱ्या गाड्या तपासणी आणि परवान्याच्या नावाखाली अडवून ठेवल्या जातात. गाड्या वेळीच सोडण्यात न आल्याने, गतवर्षी मोठ्या संख्येने गाडीतच गुदमरून बकऱ्यांचा मृत्यू होऊन संबंधित व्यावसायिक तसेच शेळीपालन करणारांचे नुकसान झाले होते.
या पार्श्वभूमीवर यंदा अशी अडचण होऊ नये यासाठी तपासणी नाक्यावर वेळेवर गाड्या सोडण्याचे तसेच परवाना मिळाल्यानंतर कत्तलखान्यात मागणीनुसार जनावरे कापून देण्याचे आदेश तातडीने जारी करण्यात यावेत, अशी मागणी जनता दल (से) मुंबई पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, कार्याध्यक्ष सलिम भाटी, उपाध्यक्ष शिराज शेख, मतीन खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याकडे केली आहे.















