
या निवेदनात यादव यांनी म्हटलं आहे की, मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूरशेखनाका येथील शंभर वर्ष झालेले ब्रिटीशकालीन जुने दोन पूल असून या पुलांची स्थिती अत्यंत खराब आहे. या पुलाखालून वाशिष्ठी नदीचे मोठे पात्र असून त्यात कोयना वीज निर्मितीचे, कोळकेवाडी धरणाचे तसेच सह्याद्रीच्या डोंगरातून येणारे पाणी यामुळे पावसाळ्यात अनेक वेळा या नदीला मोठा पूर येऊन आजूबाजूच्या परिसरात तसेच चिपळूण शहराला याचा मोठा फटका बसतो. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे हा पूल तब्बल दहा ते बारा वेळा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती.
महाड पोलादपूर येथील सावित्री नदीवरील दुर्घटनेनंतर सदर पुलाच्या दुरुस्तीबाबत येथील स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकवेळा याबाबत मागणी करूनही बांधकाम विभागाकडून अद्याप पर्यंत ठोस अशी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्याचबरोबर सदर पुलालगत तयार होत असलेल्या नवीन पुलाचे काम सुद्धा सद्यस्थितीत बंद आहे. सध्या कोकणात वाढत असणारा पाऊस पाहता सदरचा पूल वाहतुकीसाठी दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. या पुलावरून चिपळूण- खेड तालुक्यातील लोक, त्याचप्रमाणे लोटे औद्योगिक वसाहतीमधील कामगार, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. तरी या सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदरचा पूल पावसाळा संपेपर्यंत वाहनांकरिता त्वरित बंद करण्यात यावा व तशा सूचना प्रशासनाला त्वरित देण्यात याव्यात. नवीन पुलाचे काम सुरु होण्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.