रत्नागिरी : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील खेड, चिपळूण, गुहागर आणि लांजा तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. दापोली, संगमेश्वर, रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यांमध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या तालुक्यांतल्या बाजारपेठांमधील बहुतांश दुकाने सुरु होती. बंदचा एसटी सेवेवर मोठा परिणाम झाला. जिल्ह्यात सकाळच्या सत्रात एसटीच्या काही फेऱ्या सुरु होत्या. त्यानंतर मात्र वाहतूक काही ठिकाणी अपवाद वगळता संपूर्ण दिवसभर बंद होत्या.
चिपळूणमधील प्रांत कार्यालयासमोर मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक साडेबारा वाजल्यापासून ठप्प झाली होती. महामार्ग ठप्प झाल्याने वाहतूक चिपळूणमधील बायपास मार्गे वळविण्यात आली.
खेड, चिपळूण गुहागर आणि लांजा या तालुक्यांमधील बाजारपेठा पूर्णतः बंद होत्या. या तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातून आंदोलकांनी मोर्चे काढले. बाजारपेठ, एसटीची वाहतूक, शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्यात आली. सकाळी लोटे येथे मुंबई-गोवा महामार्ग सकल मराठा समाजाने रोखला होता, मात्र काही वेळानंतर हा महामार्ग पोलिसांनी सुरळीत केला.
दरम्यान मंडणगड, दापोली, रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीत शहारातून रॅली काढून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं.