रत्नागिरी : अचानक बदललेल्या वातावरणाचा फटका हापूस आंब्याला बसू लागला आहे. त्यामुळे आंब्याच्या ऐन मोसमात बहरात आलेली कैरी गळून पडू लागली आहे. सातत्याने होणार्या बदलत्या वातावरणामुळे सुमारे ७० ते ७५ टक्के नुकसान जिल्ह्यातील शेतक-यांचे झाले आहे. परिणामी बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत.
उष्म आणि थंड असा वातावरणाचा लपंडाव सुरू असल्याने त्याचा विपरित परिणाम आंब्यावर जाणवू लागला आहे. कोकणची अर्थव्यवस्था मुख्यत्वे हापूसवर अवलंबून असते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून होणार्या हवामान बदलामुळे आंबा बागायतदारांना नुकसान सोसावे लागत आहे. या वर्षी तर आंब्याचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, ती आता मावळली आहे.
चांदेराई गावात असणार्या बागांमध्ये कैरीची गळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. वातावरणातला हाच बदल कायम राहिल्यास हापूसच्या उत्पादनात अधिक घट होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, काही ठिकाणी नव्या झाडांना मोहर आला आहे, मात्र फळधारणा झालेली नाही, अशी परिस्थिती आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर आंबे व्यवसायाचे गणित कोलमडून गेले आहे.