रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेमार्फत व लायनेस रिजन को ऑर्डिनेटर प्राची शिंदे यांच्या नियोजनाखाली रत्नागिरीतील महिला बचत गटांच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज साई मंगल कार्यालयात करण्यात आले. या प्रदर्शनात ग्रामीण व शहरी भागातील 50 महिला बचत गट व उद्योजिकांनी सहभाग घेतला आहे. कोकणी मेव्यासह, दिवाळीसाठी विविध प्रकारच्या वस्तू, आकाशकंदिल, भाजणी, खाद्यपदार्थ, हस्तकौशल्यातून साकारलेल्या विविध वस्तू आणि झाडांची रोपे यासह अनेकविध वस्तू उपलब्ध आहे. हे प्रदर्शन चार दिवस असणार आहे.
प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्राची शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या उर्मिला घोसाळकर, लायन्स क्लबच्या अध्यक्ष सुप्रिया बेडेकर, सरस फूड्सच्या संचालिका सरस्वती गांधी, लायनेस क्लब अध्यक्ष सईदा बाग, युनियन बँकेच्या व्यवस्थापिका सिरत राणे, दीप्ती फडके, अंजली साळवी व महिला बचत गटाच्या सदस्य उपस्थित होत्या. या वेळी सरस्वती गांधी यांनी त्यांचे उद्योगातील विविध अनुभव सांगितले. त्या म्हणाल्या की, गेली काही वर्षे सेंद्रिय आंबा शेती करत आहे. कोकणी मेव्याचे पर्यटकांना आकर्षण आहे. त्यामुळे सर्व गटांनी या उत्पादनांसाठी मेहनत घ्यावी.
उर्मिला घोसाळकर यांनी रत्नागिरीतील महिला उद्योजिकांचे कौतुक केले. प्राची शिंदे यांनी या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी बचत गट आणि महिला उद्योजिकांचे मोठे योगदान लाभल्याबद्दल आभार मानले. महिला उद्योजिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे भविष्यात मोठ्या स्वरूपात गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला.