“क्रांतिकारी पत्रकार बाबुराव विष्णू पराडकर” या पुस्तकाचे प्रकाशन
नवी मुंबई : कोकण विभागीय महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते उपसंचालक (माहिती) कोकण विभाग डॉ. गणेश व. मुळे यांनी लिहिलेल्या “क्रांतिकारी पत्रकार बाबुराव विष्णू पराडकर” या पुस्तकाचे प्रकाशन आज झाले. यावेळी रायगडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, रायगडचे अपर जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर उपस्थित होते.
देशमुख यांनी डॉ. मुळे यांच्या पुस्तकाचे कौतूक करून शुभेच्छा दिल्या. मुळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असणारे बाबुराव पराडकर हिंदी पत्रकारितेत पितामह आहेत. कोकणातील अनेक मान्यवरांत त्यांची देश पातळीवर गणना होते. हे पुस्तक पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल असे ते म्हणाले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात काम करण्यापूर्वी पत्रकारिता क्षेत्रात काम केल्यामुळे पत्रकारितेचा अभ्यास करताना बाबुराव पराडकर यांच्या पत्रकारितेचा अभ्यास केला. पराडकर यांनी अनेक शब्द हिंदीत रुढ केले आहेत. मराठी माणसाचे हिंदी पत्रकारितेचे योगदान नव्या पिढीसमोर आणण्यासाठी हे पुस्तक लिहिण्याची कल्पना मनात आली. असे डॉ. मुळे यांनी यावेळी सांगितले.
अथर्व पब्लिकेशनच्या या पुस्तकात हिंदी पत्रकारितेतील पितामह म्हणून ओळखले जाणारे बाबुराव विष्णू पराडकर हे मराठी भाषिक असून हिंदी पत्रकारिता कशी समृध्द केली आहे. हे या पुस्तकात मांडण्यात आले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रा.गजानन शेफाळ यांचे आहे. डॉ. गणेश मुळे यांचे या आधी आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.