(पुस्तक परिचय)
एका हातात पिस्तुल, तर दुसऱ्या हातात लेखणी आणि खिशात ‘आजʼ आणि ‘रणभेरीʼ सारखी वर्तमानपत्र अशा रुपातील बाबुराव विष्णू पराडकर यांच्यासारखा लढवय्या पत्रकार म्हणजे खरोखरच देशातील पत्रकारांचे आराध्य दैवतच म्हणायला हवे. खरं पाहिलं तर मुळचे ते मराठी होते किंवा हिंदी हा भाषिक प्रश्नच उद्भवत नाही. कारण जसा न्यायाधीशाला कुठलाही धर्म नसतो तशी पत्रकारिताही धर्म-जात-भाषा पलीकडील आहे असे आपण मानतो. त्यामुळेच पराडकरांनी जे जाज्वल्य विचार पत्रकारांच्या पिढ्यांना दिले तो वारसा आपण जतन करून ठेवला पाहिजे. यासाठीच या पुस्तकाचा प्रपंच असावा.
पण खरंच बाबुराव विष्णू पराडकर कोण होते? त्यांची मराठीशी नाळ दिसतेय पण मग मराठीपेक्षा त्यांना हिंदी साहित्यात पत्रकारितेत एवढे सन्मानाचे स्थान का? त्याचप्रमाणे या महान व्यक्तिमत्वाने पत्रकारितेला काय दिले याचा इत्यंभूत उहापोह आपल्याला वाचायला मिळतो तो डॉ गणेश वसंत मुळे यांच्या “क्रांतिकारी पत्रकार बाबुराव विष्णू पराडकर” या मराठी पुस्तकातून विशेष म्हणजे, हिंदी साहित्य आणि पत्रकारिता विश्वात अग्रस्थान मिळालेल्या या महान पत्रकाराच्या जीवनावरील हे मराठी भाषेतले पहिलेच पुस्तक आहे. डॉ. गणेश मुळे हे सध्या कोकण विभागाचे माहिती उपसंचालक असून पूर्वी त्यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रातही सेवा केली आहे. आपल्या दिल्लीतील कार्यकाळात स्वाभाविकपणे हिंदी भाषेशी त्यांचा जवळून संबंध आला आणि तिथल्या वर्तुळामध्ये पत्रकार बाबुराव विष्णू पराडकर यांच्यासारख्या मराठी नावाला मिळणारा गौरव त्यांनी पहिला. तेव्हा साहजिकच अधिक उत्सुकतेपोटी त्यांनी बाबुराव पराडकर यांच्याविषयी अभ्यास सुरु केला.
डॉ मुळे यांचे हे छोटेखानी पुस्तक सर्व माध्यमातील पत्रकारांनी जरूर वाचण्यासारखे आहे. एक आदर्शवादी आणि ध्येयनिष्ठ पत्रकारिता कशी केली जाऊ शकते त्याचा धांडोळा या पुस्तकात अतिशय समर्पकपणे घेण्यात आला आहे.आपल्याकडे पत्रकार म्हटला की तो भाषा आणि साहित्यातला जाणकार असलाच पाहिजे असे मानले जाते, निदान काही वर्षांपूर्वी तरी तसेच होते. पंडित बाबुराव विष्णू पराडकर यांच्याविषयी वाचतांना आपल्या लक्षात येते की, हिंदी साहित्यिकांनी बाबुरावांना आपला गुरु मानले होते. हिंदी पत्रकारितेत मोठे स्थान असलेल्या “आज” या दैनिकाचा उत्कर्ष पंडित बाबुराव पराडकर संपादक असतांना झाला आणि एक सर्वोच्च स्थान हिंदी सृष्टीत निर्माण केले.
पुस्तकाचे पहिले प्रकरण हिंदी भाषेचा देशातील विकास आणि हिंदी पत्रकारितेची थोडक्यात ओळख करून देणारा आहे. कारण हिंदी वृत्तपत्रसृष्टीने आणि हिंदी साहित्याने प्रमुख विचारधारेत विशेषत: स्वातंत्र्यसंग्रामाच्या कालावधीत एक मोठी भूमिका वठविली होती. बाबुराव पराडकर यांचा जन्म जरी वाराणसीतला असला तरी मूळ गाव म्हणजे कोकणातले मालवण तालुक्यातील पराड. त्याविषयीही या पुस्तकात विवेचन केले आहे. नंतर बाबुरावांचे वडील वाराणसीला स्थायिक झाले. तिथे जन्मलेल्या बाबुरावांनी पुढे आपल्या कष्टमय जीवनाची सुरुवात कशी केली, त्यातून अध्ययन कसे केले. डाक विभागात नोकरी मिळविली पण पुढे नंतर ती सोडून साहित्य सेवा कशी सुरु केली, पत्रकारितेचा प्रवास सुरु होण्या अगोदरच राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये सामील होऊन लोकमान्य टिळकांशी आलेला संपर्क आणि मग स्वातंत्र्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनातला उत्स्फूर्त सहभाग हे सर्व वाचतांना या क्रांतिकारी पत्रकाराचे जीवन डोळ्यासमोर उलगडते. त्यादृष्टीने या पुस्तकाचे शीर्षक उचित आहे. पंडित बाबुराव स्वत: देखील हे म्हणाले होते की, “मी कलकत्याला क्रांतिकारकासोबत काम करायला आलो होतो, पत्रकारिता माझ्या गळ्यात पडली.” पण खरं तर त्यावेळेसच्या पत्रकारितेने स्वातंत्र्य चळवळीचे अग्निकुंड तेवत ठेवण्याचे काम केले होते आणि त्यात पंडित बाबुराव पराडकर यांच्यासारख्या राष्ट्र्सेवकाचे योगदान न विसरण्यासारखे आहे.
पंडित बाबुरावांचे ज्वलंत विचार त्यांच्या अग्रलेखातून कसे ठिणग्यांसारखे बाहेर पडत ते या पुस्तकात अतिशय उत्तमरीत्या उद्धृत केले आहे. अमृत कुंभ या विष कुंभ, नवयुग मे प्रवेश, आप बीती, राष्ट्रोन्नती सर्वश्रेष्ठ धर्म, यासारखे अग्रलेख या पुस्तकात वाचल्यानंतर ते का एक महान संपादक होते याची जाणीव होते.
भविष्याचा वेध घेण्याची त्यांची किती शक्ती होती त्याविषयी या पुस्तकात बाबुरावांचेच पत्रकारितेविषयी लिहिलेले विचार बघा, ते लिहितात “पत्र निकलकर सफलतापूर्वक चलाना बडे बडे धर्तियो अथवा सुसंगठीत कंपनीयोंको संभाव होगा, पत्र सर्वांग सुंदर और आकार बडे होंगे, ग्राहकोंकी संख्या लाखोंमे गिनी जायेंगी पार ये पत्र प्राणहन होंगे. संपदकोंकी निती नाही होंगी, वेतन भोगी संपादक मालिक का काम करेंगे.लेकीन आज जो स्वतंत्रता हमे है ,वह उनको नही होंगी” खरोखरच पंडित पराडकर यांच्यासारखे ध्येयनिष्ठ पत्रकार हा आपला उज्वल वारसा आहे आणि अशा व्यक्तित्वाचा जीवनपट डॉ. गणेश मुळे यांनी अगदी योग्य शब्दांत आणि कुठेही शब्दबंबाळ न करता तो वाचकांपर्यंत पोहचविला आहे.
वास्तविक पाहता बाबुरावांची झुंझार पत्रकारिता आणि त्यांच्यातला क्रांतिकारक हा छोट्याशा पुस्तकात न बसणारा आहे पण सध्याच्या युगात जिथे थोडक्यात आणि सहज समजेल असे वाचले जाते तिथे डॉ. गणेश मुळे यांनी पंडित बाबुरावांचा जीवनपटही वाचनीय आणि सोदाहरण होईल याची काळजी घेतली आहे. आज जिथे पत्रकारांचे प्रश्न, त्यांची कर्तव्ये, हक्क यावर खुलेपणाने चर्चा सुरु आहे तिथे पंडित बाबुराव पराडकर यांच्यासारख्या प्रखर, विवेकी, अध्ययनशील आणि लोकांना कळेल अशा भाषेत आपले विचार मांडणाऱ्या पत्रकार- साहित्यिकावरील हे पुस्तक वाचायला मिळणे म्हणजे खरोखरच सुसंधी म्हणायला हवी. अथर्व प्रकाशन, जळगांव यांनी हे पुस्तक प्रकाशित केले असून प्रा.गजानन शेफाळ यांचे मुखपृष्ठ आहे. या पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे. पुस्तक संपर्क 0257-2239666
लेखक – अनिरुध्द अष्टपुत्रे