रत्नागिरी, (आरकेजी) : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस गिरीराज तथा बाबा बाईंग यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा भाजयुमोची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार बाईंग यांनी सिंधुदुर्गवर लक्ष केंद्रित केले आहे.
शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत बाईंग यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी केली. या बैठकीनुसार राज्यात भाजयुमोच्या १० हजार शाखा स्थापन करण्यात येणार आहेत. ‘अबकी बार युवकांना संधी अपार, युवा महाराष्ट्र युवा सरकार’ अशी घोषणा भाजयुमोने जारी केली आहे.
बाईंग यांनी यापूर्वी भाजयुमोचे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपद सांभाळले आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात भाजयुमोच्या शाखा, तालुका कार्यकारिणी सक्षमपणे काम करत होती. या कामगिरीची दखल घेऊन त्यांच्यावर आता सिंधुदुर्गची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजप सरकारला १००० दिवस पूर्ण होतील या निमित्ताने सर्व पंचायत समिती गणांमध्ये युवा मोर्चातर्फे अभियानप्रमुख नेमून, भाजयुमोच्या शाखेचे उद्घाटन केले जाणार आहे.
युवकांना आकृष्ट करण्यासाठी भाजप सरकारने विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती प्रसारित केली जाणार आहे. शिर्डी येथील बैठकीसाठी भाजयुमोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण दटके, सरचिटणीस आमदार संतोष दानवे, आमदार उन्मेष पाटील, अमोल जाधव, विक्रांत पाटील आदींसह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते