मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या नव्या ॲप व संकेतस्थळाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाल्याने सत्ताधारी शिवसेना संतप्त झाली होती. आयुक्तांना जाब विचारणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले होते. शुक्रवारी झालेल्या महापालिका सभागृहात शिवसेनेसह विरोधकांनी आयुक्तांना घेरण्याची व्यूहरचना आखली. आयुक्तांनी माफी मागण्यासाठी सर्वपक्ष एकत्र आले. मात्र, एेनवेळी महापौरांनी आयुक्तांपुढे लोटांगण घातले आणि वादावर पडदा टाकला. यामुळे महापौर व सभागृह नेते वगळता सर्वांनीच नाराजी व्यक्त केली.
मुंबई महापालिकेचे आधुनिक संकेतस्थळ MCGM 24 x 7 व One MCGM GIS ॲपचाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६ डिसेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आला. या कार्यक्रमाला नगरसेवक, गटनेते, उप महापौर तसेच मुंबईचे प्रथम नागरिक महापौर यांनाही निमंत्रण देण्यात आले नव्हते. यामुळे पालिका सभागृहाचा आणि मुंबईच्या प्रथम नागरिकाचा अपमान झाल्याने पालिका आयुक्तांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी एका निवेदनाद्वारे केली. या निवेदनावर बोलताना पालिका आयुक्तांना एखाद्या ॲपचे उदघाटन करावयाचे होते तर ६ डिसेंबर हा बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होता. हा दुःखाचा दिवस का निवडला, असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला. यावर काँग्रेसचे रवी राजा, मेहर हैदर, अश्रफ आझमी, सुफियान वणू, राष्ट्र्रवादीच्या सईदा खान, कप्तान मलिक, समाजवादीचे रईस शेख यांनी आयुक्तांविरोधात भूमिका मांडली. तसेच पालिका आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणण्याची सूचना शिवसेनेला केली.
महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी खुलासा करताना, मी ३४ वर्षे सरकारी सेवेत सनदी अधिकारी म्हणून काम करतो आहे. सभागृहाचे आणि लोकप्रतिनिधींचे मला अधिकार माहित आहेत. त्यामुळे कोणताही अपमान केलेला नाही. पालिकेने मुंबईचा प्रारूप आराखडा बनवला आहे. तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सुचविल्या प्रमाणे पारदर्शकता असावी, म्हणून डिजिटल ॲप बनवले व त्यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र मुख्यमंत्र्यानी ॲपचे त्वरित लोकार्पण करावे, असे निर्देश दिल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नगरसेवकांना ॲप दाखवले असते तर बरे झाले असते. यापुढे अशा घटना घडू नये याची दाखल घ्यावी, असे सांगत महापौरांनी सांगत याप्रकरणावर पडदा टाकला. तर सभागृह नेते यशवंत जाधव यांनी आम्ही मोठ्या मनाने तुम्हाला माफ केल्याचे म्हटले. महापौर विश्वनाथ महाडेश्वर व सभागृहनेत्यांच्या आयुक्तांपुढील लोटांगणामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेविकांनी सभागृहातून काढता पाय घेतला. तसेच सभागृह नेते आणि महापौरांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.
चौकट
शिवसनेच्या नगरसेविका आयुक्तांच्या दालनात घुसल्या
पालिका सभागृहात आयुक्तांविरोधात चर्चा सुरु होती. पालिका आयुक्तांना सभागृहात बोलावले जात होते. मात्र आयुक्त एका मिटिंगमध्ये व्यस्त असल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. आयुक्त सभागृहात येत नसल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेविका थेट पालिका आयुक्तांच्या दालनात घुसल्या. आयुक्त सभागृहात कसे येत नाहीत त्यांना घेऊनच जाऊ, अशा घोषणा करण्यात आल्या.