शहापूर (एस. एल. गुडेकर )
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असून सातत्याने ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने फळ बाग, भाजीपाला व विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शहापूर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने शेतकरी व वीट उत्पादकांना तातडीने शासनाने भरघोस नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शहापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी उपसभापती महेश धानके यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,तहसीलदार शहापूर यांना दिलेल्या निवेदनात महेश धानके यांनी ही मागणी केली आहे.
महेश धानके यांनी निवेदनात पुढे म्हंटले आहे की शहापुर तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भेंडी काकडी लागवड करतात तर अनेक शेतकरी भेंडी परदेशात निर्यात करत असल्याने त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते मात्र ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने भेंडी काकडी सह आंबा पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शिवाय विटांचेही नुकसान झाल्याने वीट उत्पादन व्यवसाय अडचणीत आला आहे. वाढती महागाई आणि शेतीसाठी लागणारी औषधें यामुळे उत्पादन खर्च जास्त होत असल्याने अवकाळी पावसाचा मोठा फटका शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसल्याने विम्यासह शासनाने भरघोस नुकसानभरपाई देण्याची गरज असून तातडीने नुकसानभरपाई मिळण्यासाठी शासकीय यंत्रणेला आदेश देण्याची मागणी काँग्रेसचे शहापूर तालुका अध्यक्ष,माजी उपसभापती महेश धानके यांनी केली आहे.