रत्नागिरी : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या तोंडावर मुंबई येथून येऊन येथील कुणबी समाजाचा केवळ वापर करून घेत स्वतः मात्र आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड ह्यांचे कुणबी समाजाप्रति असलेले प्रेम हे केवळ स्वार्थापोटी आहे, असा आरोप राजापूर शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी केला.
येथील कुणबी समाज हा सुज्ञ असल्याने या स्वार्थाला कदापि बळी पडणार नाही. शिवसेनेने माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुणबी समाजातील माणसाला सरपंच, पं. स. सदस्य, पं. स. सभापती सारखी मोठी पदं देऊन शिवसेनेचा तालुकाप्रमुख करून तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली. माझ्या पत्नीला शिवसेनेमुळे सरपंचपदी विराजमान होण्याची संधी मिळाली. शिवसेनेमुळे दीपक नागले सारख्या कुणबी समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील माणसाला जि.प. सारख्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या संस्थेवर सभापती म्हणून विराजमान होत जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, असे कुवळेकर म्हणाले.
निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतून येऊन समाजाचा आपल्या स्वार्थासाठी वापर करून घेण्याचा प्रयत्न लाड यांनी करू नये. कुणबी समाज हा शिवसेनेच्या धनुष्यबणालाच मतदान करेल हा मला ठाम विश्वास आहे, असेही ते म्हणाले.