
रत्नागिरी, (आरकेजी) : मुंबई गोवा महामार्गाची पुरती दुरावस्था झाली आहे. या स्थितीला कंटाळलेल्या चिपळूणातील रिक्षा व्यावसायिकांनी अखेर आज आंदोलनाचा पवित्रा घेतला. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेच्या विरोधात चिपळुणातील विविध भागातील रिक्षा व्यावसायिक आज रस्त्यावर उतरले. चिपळुणातील नगर परिषदेसमोरून रिक्षा व्यावसायिकांच्या या मोर्चाला सुरवात झाली.
मुंबई गोवा मार्गावर अवस्था बिकट झाली आहे कि, त्यातून रस्ता शोधावा लागतो. खड्यांची उंची इतकी मोठी आहे कि अनेकवेळा छोटी वाहन या खड्यात अडकून पडतात. चिपळूण रत्नागिरी दरम्यान हि महामार्गाची सर्वाधिक वाईट अवस्था आहे. या मार्गावरून दररोज प्रवास करणारे आता या स्थितीला कंटाळले आहेत. यामुळेच हतबल व अडचणीत आलेल्या चिपळुणातील रिक्षाचालकांनी रस्त्यावर उरण्याचा निर्णय घेतला. गाडीच्या मेंटेनन्सवरील खर्चामुळे रिक्षाव्यवसायाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे चिपळुणातील रिक्षाव्यवसायीकांनी आज चिपळूण प्रांत कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.