मुंबई : ई-फार्मसीविरोधात राज्यातील औषध विक्रेते आक्रमक झाले असून शुक्रवारी आझाद मैदानात आंदोलन केले. यावेळी शासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला जिल्ह्याती सर्वच औषध विक्रेत्यांनी सहभाग घेतला होता. रत्नागिरीत जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला.
‘‘केंद्र सरकार डीपीसीओ च्या सहयोगाने औषधांच्या किमती नियंत्रित करतात. रिटेलर्ससाठी १६ टक्क्यांपर्यंत तर होलसेलर्ससाठी १० टक्क्यांपर्यंत एकूण व्यापार मार्जिन मर्यादित आहे. मात्र ऑनलाईन कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ५० ते ७० टक्के सूट देत आहेत. यामुळे भविष्यात त्याचा औषध विक्रेत्यांवर परिणाम होऊ शकतो, असेही संघटनेचे म्हणणे आहे. भारतात औषधांची बेकायदेशीरपणे ऑनलाईन खरेदी-विक्री होते आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे खरेदी केल्याने लोकांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे यावर बंदी आणावी अशी मागणी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे वारंवार करण्यात आली. मात्र त्याची दखल सरकारने घेतली नाहीच, याउलट ई-फार्मसीसाठी सरकार कायदा आणण्याच्या तयारीत आहे, याला तीव्र विरोध आहे. याविरोधात ई-फार्मसी म्हणजेच ऑनलाईन औषध विक्रीला विरोध दर्शवत देशभरातील केमिस्ट आणि फार्मासिस्टने संप पुकारला. त्यामुळे देशभरातील औषधांची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. ई-फार्मसीला हिरवा कंदील दाखवण्यासाठी केंद्र सरकारने मसुदा काढला आहे. याला देशभरातील केमिस्ट आणि फार्मासिस्टनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ई-फार्मसीच्या निषेधार्थ गुरुवारी मध्यरात्रीपासून ते शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत औषधांची दुकानं बंद ठेवण्यात आली होती. मुंबईतील ६ हजार ५०० तर देशभरातील ८ लाख औषध विक्रेते संपात सहभागी झाले होते, अशी माहिती इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचे सचिव नितीन मणियार यांनी दिली.
ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला रत्नागिरी जिल्ह्यात आज उत्सुर्त प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीत आज औषध विक्रेत्यांकडून मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील औषध दुकाने आज पूर्ण बंद होती. तसेच जिल्ह्यात चिपळूण आणि रत्नागिरीमध्ये मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान रुग्णांची गैरसोय होणार नाही, त्यांना अत्यावश्यक औषधे लागल्यास प्रत्येक तालुक्यात व्यवस्था करण्यात आली होती.