मुंबई, दि. 12 : ऑगस्ट क्रांती मैदान हे एक रणमैदान होते. स्वातंत्र्य चळवळीची आठवण देणाऱ्या या मैदानाचे नुसते नूतनीकरण न करता या मैदानात स्वातंत्र्यलढा जिवंत करणारे स्मारक करावे. इतिहास जिवंत ठेवणे व तो पुढच्या पिढीपर्यंत पोचविणे हे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले.
मुंबईतील आझाद क्रांती मैदानात आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई शहराचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय, बंदरे व वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख होते तर, प्रमुख अतिथी म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख उपस्थित होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सीताराम कुंटे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी स्वातंत्र्यसैनिक श्री. सत्यबोध नारायण सिंगीत, शहीद स्क्वाड्रन लीडर मनोहर राणे यांच्या वीर पत्नी श्रीमती माधुरी मनोहर राणे, हवालदार मधुसूदन नारायण सुर्वे तसेच प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त कु. काव्या कार्तिकेयन यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर केला. सर्वप्रथम मान्यवरांनी ऑगस्ट क्रांती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर व्यासपीठावरील महात्मा गांधी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्प अर्पण केले. कोरोनाविषयक मार्गदर्शनाचे संपूर्ण पालन करत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल राज्यात हा उत्सव सुरु होत आहे. स्वातंत्र्य चळवळीत सर्वसामान्य जनतेने जातपात, धर्म यापलिकडे जाऊन देशाप्रती भावना दाखविली. अनेकांनी कुर्बांनी पत्करली. त्यांचे हौतात्म फक्त आठवण करून भागणार नाही, तर ज्यांनी आपले आयुष्य घालवले त्यांना अभिमान वाटेल असा देश उभा करता येईल का, स्वराज्याबरोबरच सुराज्य आणू शकतो का हा विचार व्हावा.
1942 ला गवालिया टँक मैदानातून स्वातंत्र्य चळवळीची सुरूवात झाली. त्यावेळचे दृष्य कसे असेल हे आठवण्याचा प्रयत्न केला तर या मैदानाचे महत्त्व लक्षात येते. हा स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास जिवंत ठेवणे, हे स्वातंत्र्य प्राणपणाने जपणे आणि त्याचे सुराज्यात रुपांतर करणे हे आपले कर्तव्य असल्याचेही श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, स्वातंत्र्याची 75 वे वर्ष राज्यात दिमाखदारपणे साजरे करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचा लढा ऑगस्ट क्रांती मैदानातूनच जन्मला, पुढे इतिहास निर्माण झाला. क्रांतीकारक शहिद भगतसिंग, हुतात्मा राजगुरु, सुखदेव यांच्याबरोबरच महात्मा गांधी, लोकमान्य टिळक या स्वातंत्र्यवीरांची प्रेरणा घेऊन राज्याला पुढील काळात वाटचाल करायची आहे. आज आपण कोरोनाच्या रुपाने दुसरा लढा लढत आहोत. गेले वर्षभर मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या लढ्यात महाराष्ट्र सक्षमपणे काम करत आहे. कोरोना लढ्यातील महत्त्वाच्या अशा लसीची निर्मितीसुद्धा महाराष्ट्रातून झाली आहे. कोरोना वाढू नये, यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन आपल्याला करावे लागणार असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले.
मुंबई शहराचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय, बंदरे व वस्त्रोद्योग मंत्री श्री. शेख म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी योगदान दिले. त्या प्रत्येकाचे एकच लक्ष्य होते ते म्हणजे स्वातंत्र्य. आजही आपल्याला आपल्या देशाची प्रगती कशी होईल, विकास कसा होईल हेच एक लक्ष्य ठेवावे लागणार आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेला स्वातंत्र्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्याची आपली जबाबदारी आहे. कोरोनामुळे देशात सध्या वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील या कामाची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली आहे. अजूनही आपल्याला काळजी घ्यावी लागणार असल्याचेही श्री.शेख यांनी यावेळी सांगितले.
महसूल मंत्री श्री. थोरात म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यात आजच्या दिवशी 12 मार्च 1930 रोजी सुरू झालेल्या मिठाच्या सत्याग्रहाने वातावरण निर्माण केले. या लढ्यात महात्मा गांधींच्या रुपाने सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाणारे सर्वसमावेशक नेतृत्व निर्माण केले. महात्मा गांधींनी दिलेल्या अहिंसा, असहकार चळवळीचे प्रशिक्षण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली राज्यघटना यांना सोबत घेऊन आपल्याला देशातील लोकशाही समर्थ करावी लागणार आहे. लोकशाही टिकविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वसामान्यांना केंद्रिभूत मानण्याच्या किमान समान कार्यक्रमावर राज्य शासन काम करत आहे. सामान्य नागरिकाच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी आम्ही काम करत आहोत.
सन 1942 च्या लढ्याचा पाया मिठाच्या सत्याग्रहाने रचला. स्वातंत्र्यलढ्यात मुंबईचे महत्त्वाचे स्थान आहे. ऑगस्ट क्रांती मैदान त्यातील एक केंद्रबिंदू आहे. या मैदानात स्वातंत्र्याचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. सांस्कृतिक कार्य संचालक श्री. चवरे श्री.थोरात यांनी आभार मानले.
सायकल रॅली आणि पदयात्रा
आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळी मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीचे व ऑगस्ट क्रांती मैदान ते मणीभवन मार्गावरील पदयात्रेचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. सायकल रॅलीत 25 व पदयात्रेत 20 विद्यार्थी सहभागी झाले होते.
- भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल देशभर कार्यक्रमांचे आयोजन
- प्रत्येक आठवड्याला एक या प्रमाणे 75 कार्यक्रम होणार
- देशातील महत्त्वाच्या 75 ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन
- महाराष्ट्रात आझाद क्रांती मैदान-मुंबई, पुण्यात आगाखान पॅलेस आणि वर्धा येथे सेवाग्राम आश्रम येथे कार्यक्रम