औरंगाबाद : राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना आज बेदम मारहाण करण्यात आली. येथील सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये हा प्रकार घडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना जबर मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे. मारहाणीदरम्यान आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली.
सुभेदारी गेस्ट हाऊसजवळ गायकवाड आले असता अचानक काही कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांना गायकवाडांवर हल्ला चढविला. यात त्यांच्या छातीला दुखापत झाली. मुंबईत दादर येथील ऐतिहासिक आंबेडकर भवन मध्यरात्री पाडण्यात आले होते. ते पाडण्यात गायकवाड यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत होता. यामुळे आंबेडकरी समाजात गायकवाड यांच्याविरोधात तीव्र असंतोष धुमसत होता. या रागातूनच आज त्यांच्यावर हल्ला झाला. याप्रकरणी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, आंबेडकर भवन पाडल्यावरून प्रकाश आंबेडकर आणि गायकवाड यांच्यात यावरून शाब्दिक चकमकीही घडल्या होत्या. मुंबईत प्रकाश आंबेडकर यांनी भवन पाडल्याच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढला होता. ज्यात लाखो नागरिक सहभागी झाले होते.