रत्नागिरी, (आरकेजी) : एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेल्या रकमेची टप्प्याटप्प्याने अफरातफर करणार्या टोळक्याच्या म्होरक्याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. सुशील मोरे असे त्याचे नाव आहे. तो चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील राहणारा आहे. सुमारे १ कोटी २६ लाख ९६ हजारांची अफरातफर करण्यात आली आहे.
चिपळूण तालुक्यासह, खेड, संगमेश्वर येथील एटीएममध्ये भरण्यासाठी रक्कम देण्यात आली होती. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर आॅडिट केले गेले, तेव्हा हा अपहार उघड झाला. अरविंद बनगे यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिली होती.
सुशील मोरेसह नीलेश पवार (रा. काटे) व नीलेश लाड (रा. चिपळूण) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते सिक्योरिट्रान्स इंडिया प्रा. लि. मध्ये काम करत होते. सुशीलने या दोघांसह एटीएममध्ये भरणा करण्यासाठी दिलेल्या रकमेतून थोडे-थोडे पैसे बाजूला काढले. कंपनीलाही संपूर्ण रक्कम भरल्याची माहिती ते देत होते. पोलिसांनी नीलेश लाड व नीलेश पवार याला यापूर्वीच अटक केली होती.