रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेने अतिक्रमण विरोधी धडक कारवाई सुरु केली आहे. मात्र अतिक्रमण हटाओ मोहिमेला गालबोट लागलं आहे. भाजीविक्रेते आणि पालिका यांच्यातील वाद हातघाईवर आला. मारूती मंदिर इथं मुख्य रस्त्यालगत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांविरोधात रत्नागिरी नगर पालिकेच्या अतिक्रमण हटाओ मोहिमेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यावेळी भाजी विक्रेत्या महिलांनी कर्मचाऱ्यांना अटकाव केला आणि प्रकरण हातघाईवर आलं. परराज्यातील विक्रेत्यांवर कारवाई करण्याचं सोडून स्थानिकांवर कारवाई होत असल्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र कारवाईसाठी आलेल्या पालिका कर्मचारी आणि भाजीविक्रेत्या महिलांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. सध्या सोशल मिडियावरून या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अखेर हे प्रकरण शहर पोलिस स्थानकापर्यत गेलं. सरकारी कामात अडथळा केला म्हणुन स्वाभिमानच्या आणि भाजी विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर रत्नागिरी नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिक्रमणाविरोधात कारवाई करताना भाजी विक्री करणाऱ्या महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप भाजीविक्रेत्या करणाऱ्या महिलांनी केला आहे. महिलांनी याविरोधात पोलीस स्थानकात लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र महिलांबाबत एवढा गंभीर प्रकार होऊनही शहर पोलीस संबंधित व्यक्तींवर गुन्हा का दाखल करत नाही, असा प्रश्न भाजीविक्रेता महिलांनी उपस्थित केलाय. पोलिसांकडून विनयभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप भाजीविक्रेता महिलांनी केलाय. पालिकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई होत नसल्याने भाजीविक्रेत्या महिला सध्या आक्रमक झाल्या आहेत.