डोंबिवली,(प्रशांत जोशी) : माजी पंतप्रधान व लोकसभेचे माजी विरोधी पक्ष नेते अटलबिहारी वाजपेयी हे स्वामी विवेकांनंद यांचे शिष्य होते आणि म्हणूनच तत्कालीन प्रदेश नेत्याचा विरोध असताना ते डोंबिवलीत ३१ डिसेंबर १९८० मध्ये आले होते. वाजपेयींच्या हस्ते त्यावेळच्या डोंबिवली नगरपालिकेच्या इमारतीवरील स्वामी विवेकानंद यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले अशी आठवण माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी सांगीतली.
डोंबिवली नगरपालिकेने पालिकेच्या इमारतीवर स्वामी विवेकानंद यांचा अर्धपुतळा बसवण्याचा व उदघाटन लोकसभेचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे हस्ते करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला होता. शिवसेनेचे माजी नगरसेवक अॅड. शशीकांत ठोसर यांनी अनुमोदन दिले होते. नगरपालिकेचा प्रस्ताव घेऊन मी पक्षाच्या प्रदेश नेत्यांकडे गेलो व अटलबिहारी वाजपेयी यांना डोंबिवलीत आणण्यासाठी विनंती केली. त्यावेळच्या एका प्रदेश नेत्याने याला विरोध केला वाजपेयींना तुम्ही लहान समजता का असा सवाल विचारला तेवढयात तेथे वेदप्रकाश गोयल ( रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचे वडील ) तेथे आले व त्यानी आपण वाजपेयींना भेटू असे सांगीतले. मग आम्ही दिल्लीत गेलो व वाजपेयीना आमत्रण दिले. डोंबिवली नगरपालिकेने एकमताने तुम्हाला बोलवण्याचा प्रस्ताव केला असल्याचे सांगीतले.
तेव्हा वाजपेयी यांनी एकूण किती खर्च केला, पुतळा कसा आहे बजेट किती असे विचारुन अवास्तव खर्च केला नाही ना असा सवाल विचारला. मगच डोंबिवलीत येण्याचे मान्य केले. मात्र मी राजकारणावर काही बोलणार नाही. मी येणार तो केवळ स्वामी विवेकानंद यांचा शिष्य म्हणून येणार असून फक्त त्यांच्याबद्दलच बोलीन अशी अट घातली होती. त्याप्रमाणे ते आले व त्यानी ४५ मिनीटे स्वामी विवेकांनद यांचेबद्दलच भाषण केले असेही त्यानी सांगीतले. हा कार्यक्रम सध्या ज्या भागाला इंदिराचौक म्हणतात तेथे नगरपालिकेच्या समोर झाला होता.
डोबिवली इतिहास ग्रंथामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण 1966 झाल्याची नोंद आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निवडक कवितांचा अर्थ कुंचल्यातून सुलेखन पद्धतीने साकारण्यात आलेला आहे. त्याचे प्रदर्शन डोंबिवलीत भरले असून, त्याला रसिकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अटलजींच्या कविताही जाणण्याचा योग डोंबिवलीकरांना आला.
सुलेखनकार राम कस्तुरे यांच्या वेदाक्षरे कलादालन व उपमहापौर राहुल दामले यांच्या वतीने अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचा अर्थ आपल्या कुंचल्यातून यथार्थ प्रकट करणारे सुलेखन कलाकृतींचे प्रदर्शन आनंद बालभवनमध्ये भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात वाजपेयी यांच्या ३५ कविता मांडण्यात आल्या होत्या. त्यात अटलजींची आवडती कविता ‘जीवन बीत चला’ ही सुलेखनातून साकारताना वाळूचे घडय़ाळ कालचक्राचं प्रतिक आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ या तीनही अवस्थेत अक्षरांचे ढिगारे दाखवून वर्तमानाच्या जागी मात्र एक अक्षरकण खाली पडताना दाखविला होता. ‘ऊचाई’ या कवितेतून व्यक्ती जेवढय़ा अधिक पदावर, उंचीवर जातो तेवढा तो एकाकी असण्याचा दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यासोबतच ‘आओ फिर से दिया जलाये’, ‘पहचान’, ‘अमरआग’, ‘यक्षप्रश्न’, ‘आओ मन की गांठे खोले’, ‘गीत नहीं गाता हू’, ‘न मै चूप हू न गाता हू’, ‘स्वतंत्रता दिवस की पुकार’ अशा विविध निवडक कवितांचा अर्थ राम कस्तुरे यांनी उलगडून दाखविला होता.
सुलेखनकार राम कस्तुरे याविषयी तेव्हा म्हणाले, वाजपेयी यांच्या कवितेत राष्ट्रभावना, मानवी जीवनाची मूल्ये प्रतिबिंबीत झालेली दिसतात. अटलबिहारी वाजपेयी यांची व त्यांच्या कवितांची एक वेगळीच उंची आहे, त्याच उंचीवर जात या कविता सुलेखनाच्या माध्यमातून उलगडल्या आहेत.