रत्नागिरी (आरकेजी): औद्योगिक क्रांती व विजेमुळे कापड व्यवसायासह अनेक व्यवसाय बदलले. संगणकामुळे सर्वच व्यवसायांनी कात टाकली. पूर्वी तंत्रज्ञान ३०-४० वर्षे चालायचे. आता दोन-तीन वर्षांत झपाट्याने बदल होत आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी व नव्या संधी शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवतंत्रज्ञान अवगत करावे, कौशल्यांचा विकास करावा, असे आवाहन फिनोलेक्स अॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी केले.
केंद्र शासनाच्या निती आयोगाकडून रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या अटल टिंकरिंग लॅब फाटक हायस्कूलमध्ये सुरू झाली. डॉ. प्रसाद यांनी मोबाईलची कळ दाबली आणि फीत पुढे गेली व लॅबचे आधुनिक पद्धतीने उद्घाटन झाले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, माजी विद्यार्थ्यांचेही योगदान लॅबसाठी लाभले, याचा आनंद वाटतो. विद्यार्थ्यांनी सहज, सोप्या इंग्लिशमधून दिलेली माहिती ऐकून मी खूष झालो. मराठी टिकली पाहिजे पण इंग्रजीशिवाय पर्याय नाही, त्यानंतर त्यांनी लॅबची पाहणी केली. अत्याधुनिक लॅबमुळे विद्यार्थी संशोधक बनतील व त्यांना फिनोलेक्स अॅकॅडमीचे सर्व सहकार्य देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर म्हणाले, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जय विज्ञानचा नारा दिला व पंतप्रधान मोदी यांनी त्याला बळ दिले. त्यामुळेच निती आयोगाकडून शाळेला लॅब मिळाली. यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी, जावडेकर, मुख्यमंत्री फडणवीस, शिक्षण मंत्री तावडे यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी, संशोधकांनाही पूर्वपरवानगीने येथे संधी मिळेल. शिक्षण खात्यातील अधिकारी नरेंद्र गावंड यांनी सांगितले की, टिंकरिंग म्हणजे शास्त्रज्ञ होण्यापूर्वीची तयारी. लहान मूल नवे खेळणे उघडून बघते, दुरुस्त करते. त्याच प्रकारे कुतूहल वाढीसाठी ही लॅब उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी कार्याध्यक्ष अॅड. सुमिता भावे, उपाध्यक्ष विनय आंबुलकर, माजी विद्यार्थी फैजल मोटलानी उपस्थित होते. मुख्याध्यापिका शुभांगी वायकूळ यांनी अटल लॅबकरिता घेतलेली मेहनत सांगितली. पुण्यात प्रोजेक्ट सादर करणार्या वरेण्य जोशी व तिर्था कीर, कार्यशाळेत सहभागी इरा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. पद्मश्री आठल्ये यांनी सूत्रसंचालन केले. लॅबचे समन्वयक राजीव गोगटे यांनी आभार मानले.