मुंबई : माजी प्रधानमंत्री श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांनी देशात नवभारताची संकल्पना रुजविली. आज दिसणाऱ्या विकासाचा पाया अटलजींनी रचला आहे. त्यांचे विचार, त्यांचे व्यक्तिमत्त्व तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी अटल स्मृती उद्यान उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
बोरिवली येथे उभारण्यात आलेल्या अटल स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री योगेश सागर, राज्यमंत्री अविनाश महातेकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार भाई गिरकर, प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अटल स्मृती उद्यान हे श्रद्धेय अटलजींची सर्वोत्तम स्मृती आहे. या उद्यानांतून ते आपल्यात आहेत असाच भास होतो. स्व. अटलजींचे व्यक्तिमत्त्व हे निस्पृह, कणखर आणि अतुलनीय कटिबंधता असणारे आहे. अटलजींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सर्वाधिक विकास दर होता. त्यांनी सुरु केलेली विकासाचा सपाटा आजही सुरु आहे.
अटल स्मृती उद्यानाजवळ होणाऱ्या मेट्रो स्थानकास या उद्यानाचे नाव द्यावे, अशी मागणी तावडे यांनी केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून या स्थानकास अटल स्मृती उद्यान मेट्रो स्थानक असे नाव देण्यासंबंधी मेट्रो कार्पोरेशनला कळविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ठाकरे म्हणाले, स्व. अटल बिहारी वाजपेयी हे आदरणीय व्यक्तिमत्व होते. अशा व्यक्तिमत्वाकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. त्यांचे प्रत्येक भाषण, विचार हे पुढील पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचे काम या उद्यानाच्या माध्यमातून होणार आहे.
यावेळी तावडे यांनी उद्यानाची संकल्पना सांगितली. लोकार्पणानंतर मान्यवरांनी उद्यानाची पाहणी केली.